भंडारा : जिल्हा पोलीस दलात विविध ठाण्यांमध्ये कार्यरत पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षकांसह तब्बल ३४ कर्मचाऱ्यांच्या जंबो बदलीचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षकांनी काढले. परंतु यात अनेक चांगल्या कर्मचाऱ्यांचे प्रभाग बदलून टाकण्यात आले आहे. भंडारा जिल्हास्तरावरील पोलीस अधिकाऱ्यांच्या विविध प्रशासकीय कारणे दाखवून जिल्हा पोलीस अधिक्षकांनी बदल्या केल्या आहेत. यामध्ये सिहोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेट्टे, तुमसर ठाण्याचे पोलीस निरीक्षक गायकवाड, साकोली ठाण्याचे पोलीस निरीक्षक राऊत यांच्यासह आंधळगाव, लाखनी, मोहाडी, गोबरवाही, कारधा, भंडारा, वरठी, लाखांदूर, दिघोरी पोलीस ठाणे तसेच मुख्यालयातील सहायक पोलीस निरीक्षकांसह ३४ कर्मचाऱ्यांच्या बदलींची आदेश जिल्हा पोलीस अधिक्षकांनी काढले. या सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची अदलाबदल करण्यात आली आहे.सर्वांची बदलीच्या ठिकाणी लवकरच नेमणुक होणार आहे. पोलीस ठाण्यामध्ये कर्मचारी संख्या कमी असण्याची ओरड नेहमीच होत असते. परंतु काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या कार्य कुशलतेने हे काम यशस्वीरित्या चालत असते. कर्मचारी कितीही कर्तव्यदक्ष असलेतरी अधिकाऱ्यांच्या आदेशापुढे त्यांची चालत नसल्याचे अनेकदा पहावयास मिळते. जिल्हा पोलीस दलात झालेल्या बदल्यांमध्ये अनेकांना त्यांच्या मनपसंतीच्या ठिकाणी नेमणुक दिल्याने तर काहींना जाणीवपूर्वक इतर ठिकाणी हलविल्याचा सूर उमटत आहे. (प्रतिनिधी)
पोलीस विभागात ३४ अधिकाऱ्यांच्या बदल्या
By admin | Published: July 09, 2016 12:38 AM