देवानंद नंदेश्वर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : प्रधानमंत्री घरकुल योजनेतील घरे पूर्ण करण्यासाठी राज्य शासनासह जिल्हा प्रशासनाने जनजागृती केली असली तरी गत तीन वर्षात जिल्ह्यात साधारण ३४३० घरकुल अपूर्ण असल्याची धक्कादायक माहिती प्राप्त झाली आहे. थेट रक्कम लाभार्थ्याच्या खात्यात आॅनलाईन पध्दतीने वर्ग केली जात असली तरी जनधन खात्याचा सावळा गोंधळ, घरांच्या कामाचे टप्प्यानुसार मुल्यांकन व रक्कम देण्यास होणारी दिरंगाई यामुळे घरकुल रखडल्याचे कारणे सांगितली जात आहेत.दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाना प्रधानमंत्री घरकूल योजनेचा लाभ दिला जात असतो. साधारण एक लाख ३० हजार रुपयांचे अनुदान शासनाचे, तर १८ हजार ९० रुपयांचे अनुदान रोहयोच्या मंजुरीपोटी दिली जात असते. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत योजना राबविली जात आहे. गत तीन वर्षात जिल्ह्यात केंद्र शासनाने या योजनेतून १५५११ घरकुलाचे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी १५२०१ घरकूले मंजूर केले. त्यापैकी ११ हजार ७७१ घरकुले संबंधित लाभार्थ्यांनी पुर्ण केले आहे. म्हणजे अजूनही ३४३० घरे अपूर्ण आहेत. गतवर्षी जिल्हा परिषद प्रशासनाने अनेक वर्षांपासून रखडलेल्या घरकुलासाठी जिल्ह्यात पंचायत समिती स्तरावर मिशन संपूर्ण घरकूल मोहीम राबविली होती. असे असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणात घरकुलांची कामे रखडली आहेत. गतवर्षी २९७६ घरांपैकी अजूनही १५०७ घरकुलांची कामे अपूर्ण आहेत. प्रशासनाने घरकुलांच्या कामाबाबत लाभार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. सदर अधिकारी प्रत्यक्ष लाभार्थ्यांशी संवाद साधून अडचणी देखील समजून घेतात. परंतु घरकुलाची रक्कम थेट आॅनलाईन पध्दतीने लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जात असते. यात पारदर्शकता असली तरी लाभार्थ्यांना हप्त्याची रक्कम वेळेवर मिळत नाही. कुणाचे जनधन बचत खाते आहे, तर बहुतांश घराचे मुल्यमापन केले जात नसल्याने रक्कम मिळत नाही, असे काही लाभार्थ्यांचे म्हणणे आहे.घरकुलाची रक्कम साधारण चार हप्त्यात दिली जाते. त्यात पहिल्या टप्यात २० हजार रुपये, दुसºया व तिसºया टप्यात प्रत्येकी ४५ हजार रुपये, तर चवथ्या टप्यात २० हजार रुपये असे एकुण १ लाख ३० हजार रुपये दिले जाते. पहिल्या टप्यात २० हजार रुपये दिले जात असले तरी एवढ्याशा रकमेतून घरपायव्याचे काम पूर्ण होत नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना स्वत:च्या खिश्यातून रक्कम टाकावी लागते. याशिवाय पुढील रकमेसाठी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. घराच्या कामाचे मुल्यमापन करण्यासाठी लाभार्थी पंचायत समितीकडे सातत्याने हेलपाटे मारीत असतात.चालु वित्तीय वर्षात ४०२५ घरकुलांना मंजूरीप्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सन २०१९-२० या वित्तीय वर्षात केंद्रशासनाने १३८९० घरकुलांचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी ९३९४ घरकुलांना मंजूरी मिळाली आहे. यातील ३९०३ लाभार्थ्यांना पहिल्या टप्याची रक्कम वितरीत करण्यात आली. आतापर्यंत या वर्षात दोन घरकुल पूर्ण झालेली आहे.
जिल्ह्यात तीन वर्षात ३४३० घरकूल अपूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2019 5:00 AM
गत तीन वर्षात जिल्ह्यात साधारण ३४३० घरकुल अपूर्ण असल्याची धक्कादायक माहिती प्राप्त झाली आहे. थेट रक्कम लाभार्थ्याच्या खात्यात आॅनलाईन पध्दतीने वर्ग केली जात असली तरी जनधन खात्याचा सावळा गोंधळ, घरांच्या कामाचे टप्प्यानुसार मुल्यांकन व रक्कम देण्यास होणारी दिरंगाई यामुळे घरकुल रखडल्याचे कारणे सांगितली जात आहेत.
ठळक मुद्देप्रधानमंत्री आवास योजना :रक्कम मिळण्यास होणाऱ्या दिरंगाईचा फटका