लाखनी (भंडारा) : जमिनीची वाटणी करून फेरफार करण्यासाठी तलाठ्याने ३५ हजार रुपयांची मागणी केली. यात लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याने तलाठीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विदार्थ कोठीराम मेश्राम असे या तलाठ्याचे नाव असून, तो लाखनी तालुक्यातील पिंपळगाव येथे कार्यरत आहे. सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी केली. माहितीनुसार, तक्रारदार हे लाखनी तालुक्यातील पिंपळगाव येथील रहिवासी असून, शेतकरी आहेत. त्यांची वडिलोपार्जित शेती पिंपळगाव येथे आहे. त्यांनी सदर शेतजमिनीची वाटणी करून फेरफार करण्यासाठी तलाठी कार्यालयात कागदपत्रे जमा केली. यावेळी तलाठी विदार्थ मेश्राम यांनी शेतीची वाटणी करून फेरफार करून देण्यासंदर्भात ३५ हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे नोंदविली. एसीबीच्या पथकाने गोपनीय पद्धतीने शहानिशा करून तलाठी मेश्राम यांच्याविरुद्ध कारवाईसंदर्भात सापळा रचण्यात आला. यात जमिनीची वाटणी करून फेरफार करण्यासंदर्भात ३५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याने एसीबीच्या भरारी पथकाने शुक्रवारी सामेवाडा येथून सदर तलाठ्याला ताब्यात घेतले, तसेच लाखनी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई एसीबीच्या पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद तोतरे, पोलीस उपअधीक्षक महेश चाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी, पोलीस हवालदार संजय कुरंजेकर, कोमल बनकर, सुनील हुकरे, संदीप पडोळे आदींनी केली.
शेतजमीन फेरफारसाठी मागितले ३५ हजार; तलाठ्याविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 4:24 AM