भंडारा : कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेत रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या अत्यल्प असून, अधिकाधिक रुग्ण गृह विलगीकरणातच आहेत. जिल्ह्यात गुरुवारी १५५४ ॲक्टिव्ह रुग्णांपैकी केवळ २० रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान, गुरुवारी ३६८ व्यक्ती कोरोनामुक्त झाले असून, ३०० नव्या रुग्णांची भर पडली आहे.
कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेत रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण अधिक असून, त्यातही सर्वाधिक रुग्ण गृहविलगीकरणात बरे होत आहेत. जिल्ह्यात १५५४ ॲक्टिव्ह रुग्णांमध्ये भंडारा ४८५, मोहाडी १४४, तुमसर २६८, पवनी ९१, लाखनी ३०९, साकोली १९० आणि लाखांदूर तालुक्यात ६७ रुग्ण आहेत. मात्र केवळ २० रुग्ण रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेत आहेत. त्यात दहा खासगी, तर दहा शासकीय रुग्णालयात आहेत. त्यापैकी १६ रुग्ण आयसोलेशनमध्ये असून, चार रुग्ण आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत.
दरम्यान, बुधवारी १५९७ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात भंडारा ८०, मोहाडी २४, तुमसर ३९, पवनी १७, लाखनी ९९, साकोली २९ आणि लाखांदूर तालुक्यांतील १२ रुग्णांचा समावेश आहे.
तिसऱ्या लाटेत ६४७६ पाॅझिटिव्ह
कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेत ४९ हजार ८८७ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात ६४७६ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले. आरटीपीसीआर चाचणीत १६४६, तर अँटिजन चाचणीत ४८३० व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळले. गत चार दिवसांत कोरोनाने कुणाचाही मृत्यू झाला नाही.