अंतिम पैसेवारी ८४६ गावांची पैसेवारी ५४ पैसेदेवानंद नंदेश्वर भंडाराकिडींचा प्रादुर्भाव आणि निसर्गाच्या प्रकोपामुळे यावर्षी धान उत्पादनात कमालिची घट झाली. असे असतानाही खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ५४ पैसे घोषित झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची चिन्हे संपुष्ठात आली आहेत. या पैसेवारीत साकोली, लाखांदूर, लाखनी तालुका दुष्काळी यादीत आला असून भंडारा, पवनी, तुमसर व मोहाडी तालुक्यातील ४७५ गावांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा अधिक दाखविण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यात १ लाख ९७ हजार ६३ हेक्टर क्षेत्रात खरीप पिकाची लागवड करण्यात आली होती. त्याची टक्केवारी ९८.७५ टक्के एवढी आहे. धानपिकाची ९७.६९ टक्के म्हणजे १ लाख ७७ हजार ८६६ हेक्टरमध्ये लागवड करण्यात आली. खरीप हंगामात धानाचे उत्पादन कमालिचे घटल्याने शेतकऱ्यांवर संकट ओढावले. कर्जाची परतफेड कशी करायची, असा प्रश्न त्यांना पडला आहे. महसूल विभागाने घोषित केलेल्या अंतिम पैसेवारीत ४७५ गावातील पीक स्थिती उत्तम दाखवून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हा प्रशासनाने ८४६ गावांची अंतिम पैसेवारी ५४ पैसे दर्शविली आहे. यातील पवनी तालुका वगळता सहाही तालुक्यातील ३७१ गावे ५० पैसेपेक्षा कमी तर ४७५ गावात ५० पैसेपेक्षा जास्त पैसेवारी दाखविण्यात आली आहे. याविषयी शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. राज्य शासनाला केंद्राने दुष्काळी निधी दिला असतानाही त्यापासून शेतकऱ्यांना डावलण्यात येत आहे.४४ गावे पैसेवारीतून बादभंडारा जिल्ह्यात एकूण ८९० गावे आहेत. यात ८७६ गावे खरीप तर १४ गावे रबीची आहेत. ३० गावांत खरीप पिकाची लागवड करण्यात आली नाही. भंडारा तालुक्यातील १७, पवनी २, तुमसर ७, साकोली व लाखनी तालुक्यातील दोन गावांचा समावेश आहे. ही ३० गावे पिके नसलेली आहेत. पवनी तालुक्यातील १४ गावे रब्बी पिकाची आहेत. त्यामुळे त्या ४४ गावांची पैसेवारी जाहिर करण्यात आली नाही. ८९० गावांपैकी ८४६ गावांमध्ये खरीप पिकांची लागवड करण्यात आली. ८४६ गावांच्या खरीप पिकांची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आली. यात ४७५ गावांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा जास्त दाखविण्यात आली. यावर्षी धान उत्पादक शेतकरी संकटात असतानाही जिल्हा प्रशासनाने अंतिम पैसेवारी ५४ पैसे दाखवून अन्याय केला, असा शेतकऱ्यांकडून आरोप होत आहे़जिल्हा प्रशासनाने काढलेली पैसेवारी चुकीची असून त्याला आपला विरोध आहे. भंडारा व पवनी तालुका दुष्काळग्रस्त असून प्रशासनाने पध्दतशीरपणे दोन्ही तालुक्याला दुष्काळ यादीतून डावलले आहे. यासंबधी जिल्हाधिकारी व महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांची राज्य शासनाकडे तक्रार करणार आहे.- अॅड. रामचंद्र अवसरे, आमदार, भंडारा कृषी अधिकारी व महसूल विभागाने सत्य परिस्थितीचे सर्व्हेक्षण केले आहे. साकोली विधानसभा क्षेत्रात दुष्काळी स्थिती होती. जिल्ह्याची पैसेवारी ५४ पैसे असले तरी अन्य तालुक्यातील शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या सुधारीत निकषाप्रमाणे अनुदानासाठी पात्र ठरविण्यात येणार आहे.- राजेश काशिवार, आमदार, साकोलीशासनाच्या सुधारीत निकषाप्रमाणे खरीप पिकांची अंतिम पैसवारी काढण्यात आली. ३७१ गावे ५० पैसेपेक्षा कमी तर ४७५ गावात ५० पैसेपेक्षा जास्त पैसेवारी आहे. हा अहवाल राज्य शासनाकडे पाठविण्यात आला असून दुष्काळग्रस्त गावांसंदर्भात शासनस्तरावर निर्णय घेतला जाणार आहे.- सुजाता गंधे, उपजिल्हाधिकारी(महसूल), भंडारा.
३७१ गावे दुष्काळग्रस्त!
By admin | Published: January 02, 2016 8:34 AM