भंडारा : निर्दयपणे वाहनात कोंबून कत्तलीसाठी जाणाऱ्या तब्बल ३८ जनावरांची सुटका पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावरील शहापूर येथे करण्यात आली. याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जवाहरनगर येथील ठाणेदार पंकज बैसाने यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यात जनावरांची एका वाहनातून तस्करी होत असल्याचे कळले. त्यावरून त्यांनी शहापूर येथे सापळा रचला. दोन वाहनातून जनावरे जात असल्याचे दिसून आले. या वाहनांची तपासणी केली असता, त्यात तब्बल ३८ जनावरे आढळून आली. या जनावरांची किंमत १ लाख ९० हजार रुपये आहे. ही जनावरे एकमेकाला आखूड दोरीने बांधून ठेवलेली होती, तसेच वैरणाची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. यावरून बालू ऊर्फ बालगोपाल ऋषीजी दुरुगकर रा. आंबेडकर वाॅर्ड शहापूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक फौजदार साखरे करीत आहेत. या जनावरांची रवानगी भगीरथा गोअनुसंधान या गोशाळेत करण्यात आली.