राजू बांते
मोहाडी (भंडारा) : चार सख्ख्या बहिणींनी शालेय कुस्तीच्या क्रीडा स्पर्धांत पहिल्यांदाच भाग घेतला. आधी तालुका नंतर जिल्ह्यात विविध गटांत त्या खेळल्या. गादीवर खेळण्यात आलेल्या कुस्तीत त्या बहिणींनी मैदान गाजवले. कुस्ती स्पर्धेत चौघींनी प्रथम क्रमांक प्राप्त करून जिल्ह्यात आपली वेगळी छाप निर्माण केली आहे.
‘मुलींना खेळायला पाठवता, मुली खेळून काय करणार,’ असं ग्रामीण भागात हमखास बोललं जातं. पण, रोहणा गावाच्या प्रज्वली, प्रणयी, दीक्षू व प्रतिज्ञा राजू कहालकर या सख्ख्या बहिणींनी टीकेचे परिवर्तन प्रशंसनेत केले. रोहणा येथील एक नाही सहा मुलींनी जिल्हा शालेय क्रीडा स्पर्धेत ‘दंगल’ (कुस्त्यांचा फड) गाजवून गावाला मान प्राप्त करून दिला. गावात पाच वर्षांपूर्वी महाराष्ट्र केसरी कुस्तीचा आखाडा भरविण्यात आला होता. या मुलींनी त्या कुस्त्यांचे क्षण आपल्या डोळ्यांत साठवून घेतले. याच स्पर्धेतून त्यांना कुस्ती खेळण्याची प्रेरणा मिळाली.
घरीच मॅटवर कुस्तीचे प्रशिक्षण सुरू झाले. प्रशिक्षक कोणी बाहेरचे नव्हते तर त्या चार मुलींचे त्यांचे बाबाच प्रशिक्षक झाले. मुलींची ध्येय, आवड, जिद्द, चिकाटी आणि मेहनत बघून त्यांच्या बाबांनी मॅट घेऊन दिला. मग नियमित घरीच सकाळ व सायंकाळी मॅटवर कुस्तीचे प्रशिक्षण सुरू झाले. प्रथमच प्रज्वली ४३ किलोग्रॅम वजनी गटात, प्रणयी ४० किलोग्रॅम वजनी गटात, दीक्षू ३३ किलोग्रॅम वजनी गटात व प्रतिज्ञा ३६ किलोग्रॅम वजनी गटात तालुका व जिल्ह्यात कुस्तीच्या मॅटवर चारही बहिणी उतरल्या. अन् त्या तालुका व जिल्हा स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला. त्यांची वर्धा येथे होणाऱ्या विभागीय शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. प्रज्वली ही ११ वीत जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय मोहाडी येथे शिकत आहे. प्रणयी ही नवव्या वर्गात सुदामा विद्यालय मोहाडी, तर प्रतिज्ञा ही जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा रोहणा येथे सहावीत शिक्षण घेत आहे.
महात्मा जोतिबा फुले हायस्कूल मोहगाव देवी येथील मुख्याध्यापक राजू बांते, ज्येष्ठ शिक्षक हंसराज भडके, सहायक शिक्षक गजानन वैद्य, हितेश सिंदपुरे, शिखा सोनी, गोपाल मडामे, शोभा कोचे, मोहन वाघमारे, श्रीहरी पडोळे यांनी मुलींचे घरी जाऊन पुष्पगुच्छ व गौरवपत्र देऊन कौतुक केले. आई-वडिलांचे घरातून प्रोत्साहन व मानसिक बळामुळे यश मिळाल्याचे त्या बहिणींनी सांगितले.