जिल्हा परिषदमधील अनुकंपा नियुक्तीबाबत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चर्चा झाली होती. हा विषय तात्काळ मार्गी लावण्यात येईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून यांनी जिल्हा नियोजनच्या बैठकीत सांगितले होते. त्यानुसार अनुकंपाची पदे तातडीने भरली आहेत. या निर्णयामुळे कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. २७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या सभेत पदोन्नतीचा विषयसुद्धा मार्गी लागणार असल्याने कर्मचाऱ्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अनुकंपा तत्त्वावर भरण्यात आलेल्या पदामध्ये दोन कनिष्ठ सहायक, एक वरिष्ठ सहायक, एक आरोग्य सेवक, एक विस्तार अधिकारी सांख्यिकी, १६ शिक्षण सेवक, दोन कनिष्ठ अभियंता, १३ परिचर, दोन अंगणवाडी पर्यवेक्षिका, दोन ग्रामसेवक अशा एकूण ४० पदांचा समावेश असून ही सर्व पदे भरण्यात आली आहेत. अनुकंपा ही शैक्षणिक पात्रता व प्रवर्गात रिक्त असणाऱ्यांना ज्येष्ठतेप्रमाणे देण्यात आल्या आहेत. तसेच सर्व संवर्गातील पदोन्नती सभा २७ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली आहे.
२७ ऑगस्ट रोजी पदोन्नती सभा घेऊन सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात येईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून यांनी सांगितले. पदोन्नतीमध्ये ही सर्वांना समान न्याय देण्यात येणार आहे. अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती मिळालेल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या पदाच्या कर्तव्याचे जबाबदारीने निर्वहन करावे व सर्वसामान्य नागरिकांची कामे वेळेत पार पाडावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.