युवराज गोमासेलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्याला ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने जलसंधारण विभागाचे ४३ बंधारे उद्ध्वस्त झाले असून, त्यात मामा तलाव, कोल्हापुरी बंधारे, सिमेंट प्लग बंधारे व साठवण बंधाऱ्यांचा समावेश आहे. सुमारे चार कोटी ९० लाख ५० हजारांचे नुकसान झाले असून, रब्बी हंगामातील सिंचन अडचणीत सापडले आहे. जिल्हा परिषद जलसंधारण विभागाच्या वतीने सिंचनाची सोय वाढावी यासाठी ठिकठिकाणी बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यात जलयुक्त शिवार योजनेतून नाल्यांवर सिमेंट प्लग बंधारा, साठवण बंधारा व कोल्हापुरी बंधारे, मामा तलावांचा समावेश आहे. यामुळे एका पाण्याचा दुष्काळ संपला. तसेच भूगर्भातील जलसाठा वाढला. सिंचनाच्या जाळ्यांमुळे शेतीच्या उत्पादनात भरीव वाढ होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ झाली. मात्र, मात्र अनेक वर्षांपासून देखभाल-दुरुस्ती करण्यात आली नाही. दरवर्षी पूर व अतिवृष्टीचा फटका बसतो आहे. यंदा तीनदा पूर व अतिवृष्टीची झळ बंधाऱ्यांना बसली. यामुळे नाल्यांवर बांधलेल्या बंधाऱ्याचे व तलावांचे मोठे नुकसान झाले. जलसंधारण विभागाच्या सर्वेक्षणात ४३ सिमेंट पल्ग बंधारा, साठवण बंधारा व कोल्हापुरी बंधाऱ्यांचे नुकसान झाले आहे.मामा तलावांना अतिक्रमणाचा विळखाजिल्ह्यातील जुने मालगुजारी (मामा) तलावात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. यामुळे सिंचन क्षमतेवर मोठा परिणाम झाला आहे. तलावांच्या जागेवर अनेकांनी शेती केल्याने तसेच सिंचन क्षमतेवर परिणाम होण्यासोबत जलसाठ्यातही मोठी घट झाली आहे. अनेकांनी घरांचे बांधकाम तलाव क्षेत्रात केले आहे. वाढलेल्या अतिक्रमणामुळे मासेमारी व्यवसाय संकटात सापडले असून अतिक्रमण काढण्याची मागणी होत आहे.
गावनिहाय नुकसानग्रस्त बंधारे व तलाव- जांभोरा, झबाडा, हरदोली, नेरी, विहीरगाव, सिंदपुरी, देव्हाडी, धुटेरा, पिटेसूर बोडी, गर्रा, तुडकापुरी, आतेगाव, उकारा, नेरला, निष्टी, सोनेगाव, वाही, कान्हळगाव येथील मामा तलावांचा समावेश आहे. महालगाव, मलिंदा, कान्हळगाव, चिचोली, आंधळगाव, पिंपळगाव, सीतेपार, विहीरगाव, लोभी, साकोली, खापरी रेहपाडे येथील साठवण बंधारे, करडी, आंधळगाव, सानगडी, सोनेगाव येथील कोल्हापुरी बंधारे, निलागोंदी, गोंडीशिवनाला येथील लघू पाटबंधारे तलाव तर भावड येथील सिमेंट प्लग बंधाऱ्याचा समावेश आहे.
नुकसानीचा शासनाला अहवाल- पूर व अतिवृष्टीमुळे जिल्हा परिषद जलसंधारण विभागाचे चार कोटी ९० लाख ५० हजारांचे नुकसान झाले. निधीच्या पूर्ततेसाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला अहवाल पाठविण्यात आला आहे. शासनाकडून काय मदत मिळते, केव्हा बंधाऱ्यांची दुरुस्ती होते, याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे.
नुकसानग्रस्त बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी शासनाला प्रस्ताव पाठविला. निधीअभावी अडचणी वाढल्या आहेत. निधीची पूर्तता होताच नियोजनानुसार तलाव बंधारे यांच्या सुधारणा व दुरुस्तीच्या कामांना प्रारंभ केला जाईल.- सुभाष कापगते, जलसंधारण अधिकारी, जिल्हा परिषद, भंडारा.