करडी (पालोरा) : घरकुल प्रपत्र 'ड' ऑनलाईन यादीतून ४८०२ लाभार्थ्यांना वगळल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मोहाडी तालुक्यात याप्रकरणी असंतोष व्यक्त होत आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अनेक वंचितांना घरकुल योजनेतून लाभ मिळाला. गरजवंताचे घर बांधणीचे स्वप्न पूर्ण झाले. सन २०१६-२०१७ मध्ये नव्याने तयार प्रपत्र 'ड' घरकुल यादीमध्ये अनेकांचे नाव समाविष्ट होते. त्यामुळे लाभार्थ्यांना आपले घरकुलाचे स्वप्न पूर्ण होतील, अशी आशा होती; परंतु जेव्हा २०२० मध्ये ग्रामसभेने मंजुरी देत पाठविलेली यादी ऑनलाईन होऊन ग्रामपंचायतींकडे आली. त्या यादीतून अनेक गरजवंतांची नावे वगळण्यात आली. परिणामी अनेक लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार आहेत.
गावागावांत प्रपत्र 'ब' घरकुल यादीत नावे समाविष्ट नसलेल्या गरजवंतांनी ग्रामसभेत प्रश्न लावून धरीत न्यायाची व घरकुलाचा लाभ देण्याची मागणी केली होती. शासन प्रशासनाच्या मंजुरीनंतर प्रपत्र 'ड' यादी नव्याने तयार करून न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला; परंतु २०२० मध्ये ऑनलाईन होऊन मंजूर यादी ग्रामपंचायत कार्यालयात पोहोचली, तेव्हा अनेकांना धक्का बसला. मंजूर यादीतून अनेकांची नावे वगळण्यात आल्याचे दिसताच गरजवंतांचा संताप अनावर झाला आहे. यादीतील घोळामुळे अनेक लाभार्थ्यांचा अपेक्षाभंग झाला. मंजूर यादीत लाभार्थ्यांची संख्या अचानक घटली कशी, हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. 'एकट्या मोहाडी तालुक्यामध्ये ४८०२ लाभार्थ्यांना मंजूर ऑनलाईन यादीतून वगळण्यात आले आहे. आता लाभार्थी वंचित राहतील का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोट बॉक्स
वंचित लाभार्थ्यांकरिता जिल्हा प्रशासनाने लक्ष घालून तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी करावी व वंचित लाभार्थ्यांना लाभ द्यावा.
- निशिकांत नानाजी इलमे, भाजप नेते.