लाखांदूर : तालुक्यात घेण्यात आलेल्या ११ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एकूण ३५ प्रभागांतर्गत जवळपास ४८१ मतदारांनी उमेदवारांना नापसंती नोंदविली असल्याची माहिती आहे. सदर माहिती येथील तालुका निवडणूक विभागांतर्गत देण्यात आली आहे.
गत १८ जानेवारी रोजी तालुक्यात ११ ग्रामपंचायत निवडणुकीअंतर्गत मतदान घेण्यात आले होते. सदर निवडणुकीत ९ अविरोध सदस्य वगळता एकूण २१४ उमेदवार निवडणूक रिंगणात होते.यावेळी तालुक्यातील ११ ग्रामपंचायत अंतर्गत एकुण ३५ प्रभाग सदस्यांसाठी मतदान घेण्यात आले. सदर मतदानानुसार गत २१ जाने. रोजी निवडणूक निकाल जाहीर करण्यात आला. त्यानुसार सदर निकांतर्गत तालुक्यातील जवळपास ४८१ मतदारांनी ११ ग्रा. पं. तील ३५ प्रभागांतर्गत निवडणुकीत उभ्या ठाकलेल्या उमेदवारांना नापसंती नोंदविली आहे.
दरम्यान, तालुक्यातील एका ग्रा.पं. प्रभागांतर्गत तब्बल ४२ मतदारांनी उमेदवारांना नापसंती नोन्दविल्याने सर्वत्र खळबळ दिसून येत आहे. तथापि येत्या काळात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका होण्याची शक्यता असल्याने ग्रा. पं. निवडणुकीतील नापसंती नोंदविणारे मतदारांकडे संभाव्य उमेदवारांच्या नजरा खिळणार असल्याचे देखील बोलल्या जात आहे.
एकंदरीत मतदारांनी ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान करतांना लोकशाही तत्त्वाचे पालन करीत कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता तालुक्यातील ४८१ मतदारांनी उमेदवारांना नापसंती नोंदवीत जागरूक मतदाराची समाजात ओळख निर्माण केल्याचे बोलल्या जात आहे.