तुमसर : तुमसर तालुक्यात तलावांची संख्या मोठी असून, शेती सिंचनाकरिता आंतरराज्य बावनथडी प्रकल्पही अस्तित्वात आहे; परंतु प्रकल्प स्थळापासून काही अंतरावर असलेली आठ गावे सिंचनापासून अद्यापही वंचितच आहेत. या गावांना सिंचनाचा लाभ व्हावा, याकरिता ३५ कोटींचा उपसा सिंचन प्रकल्प प्रस्तावित आहे; परंतु अद्यापही या सिंचन प्रकल्पाच्या कामाला मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे हा प्रकल्प अद्यापही धूळखात पडून आहे.
तुमसर तालुक्यातील गोबरवाही परिसरातील आठ गावे सिंचनापासून वंचित आहेत. यात गोबरवाही, सीता सावंगी, सुंदर टोला, येदरबुची, पवनार खारी, गणेशपूर, हेटी टोला येथील शेतकऱ्यांना बावनथडी प्रकल्पाचे पाणी सिंचनाकरिता उपलब्ध होत नाही. पवनार खारी येथे पाटबंधारे विभागाचा मोठा तलाव आहे. तसेच येदरबुची येथे जिल्हा परिषदेचा तलाव आहे. या दोन्ही तलावांत पावसाळ्यात पाणीसाठा पूर्ण क्षमतेने होत नाही. त्यामुळे बराच तलाव कोरडाच राहतो.
भाजप-सेनेच्या कार्यकाळात राज्य शासनाने दोन्ही तलावांना बावनथडी प्रकल्पाच्या राजापूर वितरिकेला तलाव भरण्याचा प्रस्ताव विदर्भ पाटबंधारे विभागाकडे पाठविला होता. त्यामुळे उपसा सिंचन प्रकल्प येथे अस्तित्वात आल्यास पिण्याचे पाणी व सिंचनाची समस्या सुटली असती; परंतु या प्रस्तावाला अजूनपर्यंत राज्य शासनाने मंजुरी दिलेली नाही. गोबरवाही परिसरातील आठ गावांकरिता ३५ कोटींच्या उपसा सिंचन प्रकल्प तयार करण्याकरता विदर्भ पाटबंधारे विभागाकडे पाठविण्यात आला आहे; परंतु अद्याप या प्रकल्पाला मंजुरी मिळाली नाही. हा प्रस्ताव अद्यापही धूळखात पडून असल्याची माहिती आहे. सदर प्रकल्प पूर्ण व्हावा याकरिता बावनथडी प्रकल्प संघर्ष समिती गठित करण्यात आली होती. या समितीतर्फे अनेकदा निवेदने दिली व धरणे आंदोलन करण्यात आले; परंतु अद्यापही या प्रकल्पाला शासन आणि प्रशासनाचे मान्यता मिळाली नाही.
बाॅक्स
शेतकऱ्यांत प्रशासनाच्या विरोधात तीव्र असंतोष
२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीवर या परिसरातील शेतकऱ्यांनी बहिष्कार घातला होता. बावनथडी प्रकल्पापासून सदर आठही गावे ही २० ते २२ किलोमीटर अंतरावर असून या गावांना अद्यापही सिंचनाचा लाभ मिळाला नाही. ही गावे उंचावर असल्याचे कारण संबंधित विभागाचे वरिष्ठ अभियंते देत आहेत. त्यामुळे या गावाना सिंचनाकरिता पाणी उपलब्ध होत नाही. त्याकरिता उपसा सिंचन प्रकल्प उभारण्याची गरज आहे. पवनार खारी येथे मोठे तलाव उपलब्ध आहेत. या तलावांची पाणी साठवणूक क्षमता मोठी आहे. त्यामुळे कायमस्वरूपी येथे उपसा सिंचन प्रकल्प अस्तित्वात आल्यास शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध होऊ शकते; परंतु राजकीय इच्छाशक्ती येथे कमी दिसत आहे.
बावनथडी प्रकल्प हा शेतकऱ्यांच्या शेतीला सिंचनाकरिता कोट्यवधी रुपये खर्च करून पूर्ण करण्यात आला; परंतु हाकेच्या अंतरावर असलेल्या या आठ गावांना सिंचनाची सोय उपलब्ध झाली नाही. त्यामुळे येथील शेतकऱ्यांमध्ये शासन व प्रशासनाच्या विरोधात तीव्र असंतोष आहे.