वरठी (भंडारा) : शिक्षण घेत असलेल्या मुलाच्या भेटीसाठी नागपूरला जाणाऱ्या कुटुंबाच्या बॅगमधून ५ लाख ३८ हजारांचे दागिने धावत्या एसटी बसमधून लंपास करण्याची घटना तुमसर ते भंडारा प्रवासादरम्यान भंडारा तालुक्यातील जमनी येथे शुक्रवारी घडली. याप्रकरणी वरठी ठाण्यात रविवारी तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी पाच अनोळखी चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
नंदलाल धोंडबा बिल्लोरे (६१), रा. गाेवर्धन नगर, तुमसर असे दागिने चोरीस गेलेल्याचे नाव आहे. त्यांचा मुलगा नागपूर येथे एमबीए करीत आहे. त्याच्या भेटीसाठी नंदलाल पत्नीसोबत शुक्रवारी जात होते. नागपूरला मुक्काम असल्याने त्यांनी आपल्याकडील सर्व दागिने एका छोट्या बागेत ठेवून ती बॅग मोठ्या बॅगेत ठेवली. सकाळी ११ वाजेच्या सुमारास तुमसर येथून परतवाडा एसटीत दोघेही बसले. एसटी प्रवाशांनी खचाखच भरून होती. दोघेही पती-पत्नी वेगवेगळ्या आसनावर मागे पुढे खिडकीजवळ बसले. दरम्यान त्यांनी आपल्याकडील बॅग एसटीच्या साहित्य ठेवण्याच्या रॅकमध्ये ठेवली. वरठी जवळ बॅग खाली पडली. त्यावेळी शेजारील प्रवाशांनी पटकन उचलून आपल्याकडे ठेवून घेतली. बॅग परत मागितल्यावर राहू द्या, पुन्हा पडेल म्हणून मी पकडून ठेवतो, असे बोलला. त्याच्या बोलण्यावर नंदलालने विश्वास ठेवला आणि घात झाला.
एसटी बस नागपूरला पोहोचल्यावर एचबी टाऊन येथे उतरून ते मुलाकडे गेले. दुसऱ्या दिवशी शनिवारी बॅग उघडली असता दागिने लंपास झाल्याचे लक्षात आले. रविवारी वरठी पोलीस ठाणे गाठून तक्रार देण्यात आली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात पाच चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविला. अधिक तपास ठाणेदार निशांत मेश्राम करीत आहेत.
चोरटे होते मागावर
तुमसर येथून नंदलालसोबत चार ते पाच इसम एसटी बसमध्ये बसले. त्यांनी नंदलाल यांच्या आजूबाजूची जागा घेरली. यामुळे पती-पत्नीला वेगळे बसावे लागले. दरम्यान वर ठेवलेली साहित्याची बॅग मोठ्या शिताफीने पाडून आपल्या जवळ ठेवून घेतली. नंदलाल बॅग मागत असताना त्यांना विश्वासात घेण्यात इतरांनी सहकार्य केले. त्यामुळे चोरटे त्यांच्या मागावर असल्याचा संशय आहे.