भंडारा : जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या दिवसागणिक कमी होत असून रविवारी फक्त ५ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले. यात साकोली तालुक्यात ३, तर तुमसर व लाखनी तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ४९ हजार ४६९ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळले आहेत. त्यापैकी ५८ हजार २८० व्यक्तींनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. रविवारी ६४२ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात ५ व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्या. तसेच ८ व्यक्ती बऱ्या झाल्या. तालुकानिहाय आतापर्यंत बाधित रुग्णसंख्येला नजर घातल्यास भंडारा तालुक्यात २४ हजार ७४३, मोहाडी ४ हजार ३६७, तुमसर ७ हजार १३३, पवनी ६ हजार २२, लाखनी ६ हजार ५५४, साकोली ७ हजार ६९४, तर लाखांदूर तालुक्यात २ हजार ९५६ रुग्ण बाधित झाले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत १ हजार १२६ व्यक्ती मृत पावल्या असून मृत्यूदर १.८९ इतका आहे.
सक्रिय रुग्णसंख्या ६३ वर
जिल्ह्यात फक्त सक्रिय रुग्णसंख्या ६३ वर असून त्यापैकी साकोली १५, लाखांदूर १४, भंडारा १२, लाखनी ९, पवनी १ तर मोहाडी व तुमसर तालुक्यात प्रत्येकी ६ रुग्णांचा समावेश आहे. पाच तालुक्यांची वाटचाल कोरोनामुक्तीकडे होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४ लक्ष १४ हजार ४८२ व्यक्तींची चाचणी करण्यात आली आहे.