लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात गत वर्षभरात असा एकही दिवस गेला नाही की कुठे चोरी झाली नाही. दररोज कुठे ना कुठे चोरीच्या घटना घडत होत्या. वर्षभरात जिल्ह्यात ५५३ चोरीच्या घटनांची नोंद झाली असून पोलिसांना केवळ १९५ प्रकरणांचाच छडा लावण्यात यश आले आहे. गस्तीचा अभाव आणि विविध कारणांमुळे चोरटे पोलिसांच्या तावडीत सापडले नाहीत.भंडारा जिल्ह्यात गत काही वर्षात चोरींच्या घटनांचा आलेख वाढत आहे. दिवसाढवळ्या चोरीपासून ते बँकेवर दरोडा टाकण्यापर्यंतच्या घटना गत वर्षभरात जिल्ह्यात घडल्या आहेत. साकोली येथील बँक ऑफ इंडियावर ऐन निवडणुकीच्या काळात दरोडा टाकण्यात आला. तब्बल दोन कोटी रूपयांचा ऐवज लंपास झाला होता. मात्र स्थानिक गुन्हे शाखेने प्रयत्नांची पराकाष्टा करून चोरट्यांना जेरबंद केले. परंतु इतर चोरीच्या प्रकरणात चोरट्यांना जेरबंद करण्यात अपयश आल्याचे दिसत आहे. वर्षभरात वाटमारीच्या १४ घटना घडल्या. त्यापैकी केवळ सात घटनांचाच छडा लावण्यात यश आले. भरदिवसा २८ ठिकाणी घरफोडी झाल्याची नोंद आहे. त्यापैकी केवळ पाच प्रकरणांचाच छडा लागला. रात्री घरफोडीच्या १०८ घटनांची नोंद असून २५ प्रकरणांचा छडा लावण्यात आला आहे. जिल्ह्यात ४०२ ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या असून त्यापैकी १५७ प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली आहे.जिल्ह्यात एटीएम फोडण्यासह बंद घराचे कुलूप तोडून चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत. पोलीस चोरीवर नियंत्रण असल्याचे सांगत असले तरी चोरीच्या घटनेत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.भंडारा शहरासह तालुक्याचे ठिकाणच नव्हे तर चोरट्यांनी आपला मोर्चा ग्रामीण भागाकडेही वळविल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात चोऱ्या झाल्या आहेत. बहुतांश चोऱ्यांचा अद्यापही उलगडा झाला नाही. विशेष म्हणजे पोलिसांची गस्त असतानाही चोरीच्या घटना घडत आहे. त्यामुळे पोलिसांच्या गस्तीवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. अनेक लहान सहान चोरीच्या प्रकरणात तर पोलिसात तक्रार करायलाही कुणी पुढे येत नाही.चोरीच्या या घटना सोबतच फसवणुकीचे अनेक प्रकार जिल्ह्यात घडल्या आहेत. वयोवृद्धांना गाठून विविध योजनांचे आमिष देत त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटण्यात आले. तुमसर, भंडारा बसस्थानकावर मोठ्या प्रमाणात घटना घडल्या. यासोबतच महिलांच्या गळ्यातील मंगळसुत्र पळविणे आणि रोख रक्कम असलेल्या बॅग पळविण्याच्या घटनाही मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. जिल्हा पोलीस दलात विविध पथके असताना चोरट्यांचा छडा लागलेला नाही. वर्षभरात घडलेल्या घटनांचा छडा कधी लागेल हे सांगता येत नाही.मोटरसायकल चोरट्यांची दहशत कायमसार्वजनिक स्थळासह घराच्या आवारात असलेल्या मोटरसायकल चोरण्याच्या घटना वर्षभरात मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. लॉक लावलेल्या दुचाकीही चोरट्यानी लंपास केल्या आहेत. मोटरसायकल चोरट्यांची सर्वसामान्य नागरिकांनी चांगलीच दहशत घेतली आहे. भंडारा शहरातील शासकीय रुग्णालय, बसस्थानक परिसर, बडा बाजार यासह विविध ठिकाणावरून दुचाकी चोरीस गेल्या आहे. ग्रामीण भागातही दुचाकी चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. दररोज प्रसिद्ध होणाऱ्या पोलीस वार्तापत्रात एक ना एक मोटरसायकल चोरीची घटनेची नोंद असते. चोरटे मात्र पोलिसांच्या हाती अद्यापही लागले नाही.
जिल्ह्यात वर्षभरात ५५३ चोरी-घरफोडीच्या घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2020 6:00 AM
भंडारा जिल्ह्यात गत काही वर्षात चोरींच्या घटनांचा आलेख वाढत आहे. दिवसाढवळ्या चोरीपासून ते बँकेवर दरोडा टाकण्यापर्यंतच्या घटना गत वर्षभरात जिल्ह्यात घडल्या आहेत. साकोली येथील बँक आॅफ इंडियावर ऐन निवडणुकीच्या काळात दरोडा टाकण्यात आला. तब्बल दोन कोटी रूपयांचा ऐवज लंपास झाला होता. मात्र स्थानिक गुन्हे शाखेने प्रयत्नांची पराकाष्टा करून चोरट्यांना जेरबंद केले.
ठळक मुद्देकेवळ १९५ प्रकरणांचाच छडा : साकोलीतील बँक दरोड्यासह वाटमारीचे गुन्हे, गतवर्षीच्या तुलनेत चोरीत वाढ