गोपालकृष्ण मांडवकर
भंडारा : दुचाकीने आलेल्या दोन युवकांकडून गांजा तस्करी होत असल्याच्या गोपनिय माहितीवरून भंडारा पोलिसांनी सापळा रचून शुक्रवारी रात्री स्मशानभूमी परिसरात अटक केली. त्यांच्याकडून बोरीत भरलेला ६ किलो गांजाही जप्त केला असून त्याची किंमत ६० हजार रुपये असल्याचे सांगितले जाते.
लाखांदूर तालुक्यातील येथील महेश ठवरे (२८, अंतरगाव/ चिचोली, ता. लाखांदूर) आणि प्रणय मेश्राम (१९, इंदोरा, ता. लाखांदूर) अशी या युवकांची नावे आहेत. गांजाची तस्करी होणार असल्याची माहिती पोलिसांना शुक्रवारी दुपारीच मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी सापळा रचला होता. या कारवाईदरम्यान, रात्री उशिरा स्मशानभूमी परिसरात भंडारा पोलिसांनी त्यांना गांजासह रंगेहाथ पकडले. सुपारे ६० हजार रुपये किंमतीचा ६ किलो गांजा आणि दुचाकी (एमएच ३६, एव्ही १३१७) असा १ लाख १० हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. या दोघांवरही विविध कलमांखाली गुन्हे नोंदवून अटक केली आहे.
लाखांदुरातील युवकावर दुसरी कारवाई
दरम्यान मागील दोन तीन दिवसांपूर्वी लाखांदूर तालुक्यातील गवराला येथील एका युवकास गांजा विकताना पुणे पोलिसांनी अटक केल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेला दोन दिवस लोटत नाही तोच पुन्हा एकदा लाखांदूर तालुक्यातील दोन युवकांना गांजा तस्करी करतांना भंडारा पोलिसांनी अटक केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.