लोकमत न्यूज नेटवर्ककोंढा कोसरा : येथील शाश्वत पशुधन व्यवस्थापन व दुग्ध उत्पादन पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे फार्म महाराष्ट्र पशू व मत्स्य विद्यापीठाला सादर न केल्याने ६० विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता आले नाही. त्यामुळे संस्थापक डॉ.अरुण मोटघरे यांचेवर फौजदारी गुन्हा नोंद करून कारवाई करण्याची मागणी अभाविप शाखा पवनी तर्फे करण्यात आली आहे.डॉ.अरुण मोटघरे चॅरिटेबल ट्रस्टद्वारे कोसरा (कोंढा) येथे विविध अभ्यासक्रम चालविले जातात. यामध्ये विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी नेहमीच्या झाल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम हडप करणे, विद्यार्थ्यांचे मुळ कागदपत्रे निकाल लागल्यानंतर देखील न देणे असे प्रकार सुरु आहेत. यामध्ये पुन्हा एका प्रकारात वाढ झाली आहे. सन २०१८-२०१९ सत्रात येथे पशुधन व्यवस्थापन व दुग्ध उत्पादन पदविका अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या ६० विद्यार्थ्यांचे परीक्षेचे आवेदन पत्रे विद्यापीठाला सादर न केल्याने २ मे २०१९ ला सुरु झालेल्या परीक्षेस ६० विद्यार्थ्यांस परीक्षेला बसता आले नाही. त्यामुळे त्यांचे वर्ष वाया गेले विद्यार्थ्यांनी पदविका अभ्यासक्रमास प्रवेश घेताना संस्थापकाने शासन विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क व इतर शुल्क प्रदान करीत असते. तेव्हा विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क जमा करू नये ते शुल्क संस्था भरेल असे सांगितल्याने विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क संस्थेला दिल्यास ते परत मिळते. यामध्ये शासन निर्देश असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क संस्थेनी भरले असल्याचे सांगण्यात आले.परीक्षा फार्मला आवश्यक कागदपत्रे पासपोर्ट फोटो प्राचार्यांकडे सादर केले. परंतु संस्थापक डॉ.अरुण मोटघरे व प्राचार्य यांनी निष्काळजी घेऊन आवेदनपत्रे विद्यापीठाला सादर केली नाही. २ मे ला परीक्षा असल्याने सर्व ६० विद्यार्थी हॉल तिकीट मागण्यासाठी गेले असता हा प्रकार उघडकीस आला. या संबंधात संस्थापक डॉ.अरुण मोटघरे यांना त्यांच्या कार्यालयात विद्यार्थी विचारण्यासाठी गेले असता त्यांनी ५ हजार रुपये परीक्षा शुल्क प्रथम जमा करा व येणाऱ्या आॅक्टोबर महिन्यात होणाºया परीक्षेला बसा, असे उर्मट उत्तर देऊन कार्यालयातून हाकलून लावले. संस्थापक डॉ.अरुण मोटघरे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अभाविप शाखा पवनी ही संघटना पुढे आली. संघटनेचे प्रदेश संघटन मंत्री योगेश बावनकर यांनी संस्थापक व प्राचार्य यांच्यावर फौजदारी कारवाई करावी असे वरिष्ठांना निवेदन दिले आहे. विद्यार्थ्यांना न्याय न दिल्यास रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा योगेश बावनकर यांनी दिला आहे. निवेदनावर अन्यायग्रस्त विद्यार्थी तसेच अभाविप सदस्य सिद्धू मेश्राम, मोहन भेंडारकर, राजेश गजभिये, विशाल नान्हे, विजेश्वर नखाते, प्रवीण ईश्वरकर, अनिल निंबेकर, पल्लवी चिचमलकर, संगम शेरकी, महेश खोब्रागडे, राष्ट्रपाल वासनिक, देवानंद ढवळे, सीमा गराडे, ज्योती मोहीलकर, शेलाज दिवटे, सचिन घोडीचोर, तुषार भुरे, प्रितेश गोस्वामी, निखील नान्हे, खेमचंद देशमुख, संघर्ष हुमणे, शैलेश देहलकर यांच्या स्वाक्षºया आहेत.
विद्यापीठाच्या परीक्षेला मुकले ६० विद्यार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2019 12:41 AM