देवानंद नंदेश्वरलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महत्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्प जिल्ह्यात असला तरी बहुतांश सिंचनासाठी शेतकऱ्यांना मध्यम, लघू आणि माजी मालगुजारी (मामा) तलावावरच अवलंबून रहावे लागते. उन्हाळ्याची चाहूल लागताच प्रकल्पातील पाणी कमी होत आहे. सध्या जिल्ह्यातील ६३ प्रकल्पांमध्ये ५८.९२ दलघमी म्हणजे ४८.३८ टक्के जलसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत ४.६२ टक्के जलसाठा कमी असून यामुळे उन्हाळी हंगामातील सिंचन प्रभावित होणार आहे.भंडारा जिल्ह्यात चार मध्यम प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची प्रकल्पीय क्षमता ४२.८१ दलघमी असून सद्यस्थितीत या प्रकल्पात २५.३८ टक्के उपयुक्त साठा आहे. ५९.९८ टक्के जलसाठा आहे. गतवर्षी या प्रकल्पात २६.८३ दलघमी म्हणजे ६२.६७ टक्के जलसाठा होता. जिल्ह्यात ३१ लघु प्रकल्प असून या प्रकल्पात उपयुक्त जलसाठा २२.२३ दलघमी असून त्याची टक्केवारी ४१.५३ आहे. गतवर्षी याच काळात २६.७१ दलघमी अर्थात ४९.९० टक्के जलसाठा होता. २८ मामा तलावात १०.९९ दलघमी जलसाठा असून त्याची टक्केवारी ४३.२८ आहे. गतवर्षी या प्रकल्पात ११.३७ दलघमी म्हणजे ४४.४७ टक्के जलसाठा होता.मध्यम, लघु आणि मामा तलावातील जलसाठा गतवर्षीपेक्षा यंदा कमी आहे. परिणामी उन्हाळी सिंचनावर त्याचा परिणाम होणार आहे. जिल्ह्यात उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात धानाची लागवड केली जाते. या प्रकल्पांच्या पाण्यावर सिंचन केले जाते. परंतु जलसाठे निम्यावर आल्याने किती प्रमाणात पाणी सोडणार हा प्रश्नच आहे.भंडारा जिल्हा तलावाचा जिल्हा म्हणून ओळखल्या जातो. शंभर टक्के सिंचन आणि टँकरमुक्त जिल्हा आहे. मात्र अनेक तलावांमध्ये आता मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्यामुळे उपयुक्त जलसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे. मध्यम प्रकल्पांचीही हिच अवस्था असून गाळ काढण्याकडे कुणाचेही लक्ष दिसत नाही.
गोसेखुर्द आणि बावनथडीकडून अपेक्षा
- जिल्ह्यात गोसेखुर्द हा मोठा प्रकल्प असून यावर्षी पूर्ण क्षमतेने भरण्यात आला. त्यामुळे या प्रकल्पाचे पाणी सिंचनाला मिळेल अशी अपेक्षा आहे. यासोबतच महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशाच्या सीमेवर असलेल्या बावनथडी प्रकल्पाचे पाणी तुमसर, मोहाडी तालुक्याला मिळते. इतर तलावांची स्थिती गंभीर असल्याने या दोन प्रकल्पातील पाण्याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
प्रकल्पांची स्थिती- मध्यम प्रकल्प चांदपूरमध्ये १७.९२ दलघमी साठा असून त्याची टक्केवारी ६२.०६ आहे.- बघेडा प्रकल्पात ४.०४ दलघमी जलसाठा असून ८९.१२ टक्के जलसाठा आहे.- बेटेकर बोथली प्रकल्पात ९.०९ दलघमी जलसाठा असून त्याची टक्केवारी ५१.७१ आहे.- सोरना प्रकल्पात ९.८२ दलघमी जलसाठा असून ३१.७५ टक्के जलसाठा आहे.- मामा तलावात १०.९९ टक्के म्हणजे ४३.२८ टक्के जलसाठा असून बहुतांश तलाव तळाला लागले.- गतवर्षीपेक्षा यंदा पाणी पातळी वेगाने कमी होत असून उन्हाळ्यात टंचाई निर्माण होवू शकते.