युवराज गोमासेलोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : पंतप्रधान किसान सन्मान याेजनेअंतर्गत ३१ मे या मुदतीत जिल्ह्यातील ६७ हजार ९३ शेतकऱ्यांनी केवायसी केले नसल्याचे पुढे आले आहे. या शेतकऱ्यांना दरवर्षीच्या सहा हजार रुपये मदतीला मुकावे लागण्याची शक्यता आहे.पंतप्रधान किसान सन्मान याेजनेंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तीन हप्त्यात सहा हजार रुपये जमा केले जाते. यासाठी पात्र शेतकऱ्यांना ३१ मेपर्यंत आधारकार्ड व इतर कागदपत्रे जाेडून केवायसी करणे अनिवार्य हाेते. भंडारा जिल्ह्यात दाेन लाख ११ हजार ७७२ लाभार्थी शेतकरी आहेत. यापैकी एक लाख ४४ हजार ६५९ शेतकऱ्यांनी ३१ मेपर्यंत केवायसी केली आहे, तर ६७ हजार ९३ शेतकऱ्यांनी विहीत मुदतीत केवायसी केली नाही. परिणामी या शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान याेजनेंतर्गत मिळणाऱ्या सहा हजार रुपयाच्या पेन्शनला मुकावे लागणार आहे. या याेजनेच्या लाभासाठी व शेतकऱ्यांची केवायसी करण्यासाठी विशेष शिबिराचे आयाेजन करण्यात आले हाेते.
‘३१ मे’ ची होती डेडलाईनपंतप्रधान किसान सन्मान याेजनेंतर्गत केवायसी करण्यासाठी शासनाने ३१ मेपर्यंत डेडलाईन दिली हाेती. या कालावधीत जिल्ह्यातील ६८ टक्के शेतकऱ्यांनी केवायसी केली. मात्र ३२ टक्के शेतकरी वंचित आहेत.
एक लाख ४४ हजार शेतकऱ्यांना पेन्शनपंतप्रधान किसान सन्मान याेजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी तीन टप्यात सहा हजार रुपये दिले जातात. या याेजनेचा लाभ जिल्ह्यातील एक लाख ४४ हजार ६५९ शेतकऱ्यांना मिळेल.
५८३२ शेतकरी ठरले अपात्रदाेन लाख ११ हजार ७५२ शेतकऱ्यांपैकी पंतप्रधान किसान सन्मान याेजनेच्या लाभासाठी पाच हजार ८३२ शेतकरी अपात्र ठरले आहेत. यात सर्वाधिक भंडारा तालुक्यातील १२६६, माेहाडी १४०२, तुमसर तालुक्यातील १०३५, लाखांदूर ५६५, लाखनी ५५१, पवनी ४४५ आणि साकाेलीतील ३६८ शेतकरी आहेत.
केवायसीसाठी शेतकऱ्यांची कसरत
केवायसीसाठी आधारला माेबाईल नंबर संलग्न करणे बंधनकारक हाेते. हे काम गावात कुठेही हाेत नव्हते. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांनी शहरात दाेन दिवस रांग लावली. यामुळे माेठी धावपळ झाली. त्यामुळे अनेक शेतकरी वंचित राहिले.- भुपेश गाढवे, सर्पेवाडा शेतकरी
आधारला माेबाईल नंबरची सक्ती या याेजनेतून हटविण्यात आली. परंतु, त्यानंतर चार दिवस या याेजनेची लिंकच उघडली जात नव्हती. रात्री दाेन वाजेपर्यंत जावून केवायसी केली. तेव्हा कुठे या याेजनेसाठी मी पात्र ठरलाे. - अनुप सपाटे, जांभाेरा शेतकरी
मुदतवाढ देण्याची मागणी
- पंतप्रधान किसान सन्मान याेजनेचे संकेतस्थळ अत्यंत संथगतीने सुरू हाेते. त्यातच चार दिवस संकेतस्थळ उघडतच नव्हते. यामुळे अनेक शेतकऱ्यांना केवायसी करता आली नाही.- जिल्ह्यातील ६७ हजार ९३ शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी मुदत वाढ देण्याची मागणी आता शेतकरी करीत आहेत. यासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे.