भंडारा : कोरोना संसर्ग झाला की अनेकांची पाचावरण धारण बसते. विविध डाॅक्टरांचा सल्ला घेत रुग्णालयात दाखल करण्याची घरच्यांना घाई होते. मात्र भंडारा शहरातील ७० वर्षीय आजीने एचआरसीटी स्कोर ९ असतानाही गृहविलगीकरणात राहून कोरोनावर विजय मिळविला. विशेष म्हणजे रेमडेसिविर इंजेक्शनशिवाय उपचार करण्यात आले. आता त्या ठणठणीत झाल्या आहेत.
भंडारा शहरातील लाला लजपतराॅय वाॅर्डात राहणाऱ्या सुमन नांदुरकर (७०) यांना केवळ सुरुवातीला ताप आला. सर्दी, खोकला अशी कुठलीही लक्षणे नव्हती. त्यांनी शहरातील खासगी डाॅक्टरांचा सल्ला घेतला. त्यावेळी त्यांना कोरोना चाचणी करून घेण्यास सांगितले. चाचणी केली असता ती पाॅझिटिव्ह आली. वय वर्षे ७० त्यात एचआरसीटी स्कोर ९. अशा स्थितीत काय करायचे, असा प्रश्न मुलगा मनीष नांदुरकर यांना पडला. मात्र भंडाऱ्यातील डाॅ. मनाेज चव्हाण व डाॅ. मुकेश थोटे यांचा सल्ला घेतला. त्यांनी सुमनबाई यांना गृह विलगीकरणात ठेवण्यास सांगितले. औषधी लिहून दिली. गरम पाण्याची वाफ नियमित घेण्यास सांगितले. तसेच ऑक्सिजन लेव्हलवर लक्ष ठेवण्याचा सल्लाही दिला. आता सुमनबाईंची तब्येत ठणठणीत झाली आहे. एचआरसीटी स्कोर ९ असताना आणि रेमडेसिविर इंजेक्शन न घेता त्यांनी हिमतीने कोरोनावर मात केली.
बाॅक्स
आठ वर्षाआधी झाली होती बायपास सर्जरी
सुमन नांदुरकर यांच्यावर आठ वर्षापूर्वी बायपास सर्जरी करण्यात आली होती. त्यामुळे घरातील सर्व मंडळी त्यांची काळजी घेत होेत. परंतु अचानक कोरोनाचा संसर्ग झाला. परंतु या परिस्थितीत त्यांनी हिमतीने कोरोनाला हरविले. कोरोनाची भीती बाळगू नका. अंगावर दुखणे काढू नका. घरीच राहा आणि सुरक्षित राहा असा सल्ला त्या आता देत आहेत.