लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ३१ डिसेंबरपर्यंत लसीकरणासाठी विशेष मोहीम म्हणून जिल्हाभर राबवण्यात येत असलेल्या ‘मिशन लेफ्ट आउट’साठी केलेल्या प्रयत्नांची फलश्रुती आता दिसू लागली आहे. यात जिल्ह्यातील ७५ टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.लसीकरणात अग्रक्रम असणाऱ्या मुंबई, पुण्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भंडारा जिल्ह्याने लसीकरणाची सरस कामगिरी करत आज पुण्याला दुसऱ्या डोसच्या टक्केवारीमध्ये मागे टाकले आहे. भंडारा जिल्ह्यात पहिला डोस घेतलेल्या नागरिकांचे प्रमाण ९६.६१ टक्के आहे, तर दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या ७४.८६ टक्के आहे.जिल्ह्याच्या लसीकरणासाठी ८ लाख ९८ हजार ४०० एवढे उद्दिष्ट असून त्यापैकी ८ लाख ६७ हजार ९४२ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. तर, ६ लाख ७२ हजार ५०२ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. एकूण १६ लक्ष ४० हजार ४४४ डोस देण्यात आले आहेत. आज जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. फारुकी, मुख्याधिकारी विनोद जाधव यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांनी अगदी गल्लीपासून मोठ्या मोहल्ला भागात जाऊन पाहणी केली. आजच्या लसीकरणामध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणावर लसीकरण करून घेतल्याने शहरातील व जिल्ह्यातील नारी शक्ती कोरोनापासून संरक्षित झाली आहे.प्रामुख्याने शहरातील बचत गटाच्या महिलांना आज शहर उपजीविका केंद्र मिस्किन टॅक येथील कार्यक्रमात लसीकरण करण्यात आले. लसीकरण आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. फारुकी यांनी माहिती दिली. त्यानंतर सफाई कामगार वस्ती, चांदणी चौक येथेही लसीकरणाबाबत मार्गदर्शन केले. मुस्लिमबहुल वस्ती, मोहल्ला भागात विशेषत: महिलांची बैठक घेतली. या बैठकीवेळी मोबाइल लसीकरण व्हॅनसुद्धा होती, त्यामुळे तिथेच लसीकरण करण्यात आले.