भंडारा :वीज कंपन्यांच्या खासगीकरणाच्या विरोधात महाराष्ट्र राज्य वीजकर्मचारी-अधिकारी संघर्ष समितीने संपाचे हत्यार उपसले असून बुधवारपासून जिल्ह्यातील सर्व ७७५ अधिकारी-कर्मचारीसंपात सहभागी होत आहेत. तीन दिवसांच्या या संपादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यास नागरिकांना अंधारात राहण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे खासगी एजन्सीची मदत घेण्याची तयारी वीज वितरणने चालविली आहे.
सरकारने वीज कंपन्यांचे खासगीकरण करण्याचा घाट घातला आहे. या विरोधात महापारेषण, महानिर्मिती आणि महावितरण या तीनही कंपन्यांतील अधिकारी-कर्मचारी बुधवारपासून संपावर जात आहेत. भंडारा जिल्ह्यातील वीज वितरण कंपनीचे सर्व ७७५ कर्मचारी संपात सहभागी होत आहेत. दरम्यान, वीज कर्मचाऱ्यांचा संपाचा फटका सर्वसामान्यांना बसत असल्याचे चित्र आहे. संपामुळे विजेची समस्या उद्भवत असून भंडारा शहरातील बहुतांश भागासह ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. ग्राहकांना अंधारात राहण्याशिवाय पर्याय नाही.
भंडारा जिल्ह्यातील सर्व ७७५ कर्मचारी या संपात सहभागी होत असल्याने केवळ अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंताच कार्यालयात राहणार आहेत.
मोबाइल रिचार्ज करून ठेवा, पाण्याची टाकी भरून घ्या
वीज अधिकारी-कर्मचारी संपात सहभागी होत असल्याने कोणत्याही क्षणी विजेची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे वीजग्राहकांनी आपले मोबाइल चार्ज करून घ्यावेत, पाण्याच्या टाक्या भरून घ्याव्यात, असे आवाहन सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका संदेशात म्हटले आहे.
त्रास देण्याच्या उद्देशाने संप नाही
राज्यातील सर्व वीज अधिकारी-कर्मचारी तीन दिवस संपात सहभागी होत आहेत. या संपाचा त्रास ग्राहकांना होणार आहे. परंतु, ग्राहकांना त्रास होण्याच्या उद्देशाने हा संप नाही, तर खासगीकरण ग्राहक आणि कर्मचाऱ्यांच्या हिताविरोधी असून खासगीकरणाच्या विरोधात संप असल्याचे एका निवेदनात राज्य वीज अधिकारी-कर्मचारी संघर्ष समितीने म्हटले आहे.
...तर अंधाराचे साम्राज्य
वीज वितरण कंपनीने संपकाळात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी खासगी एजन्सीला सतर्क केले आहे. आवश्यकता असेल तेथे मनुष्यबळ वापरून वीजपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. मात्र, खासगी एजन्सीच्या व्यक्तींना तत्काळ बिघाड शोधणे आणि तो दुरुस्त करणे शक्य होणार नाही. त्यामुळे संपकाळात वीजपुरवठा खंडित झाल्यास ग्राहकांना अंधारात राहण्याशिवाय पर्याय राहणार नाही.
संपकाळात वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी खासगी एजन्सीला सतर्क केले आहे. त्यांच्या मनुष्यबळाच्या भरवशावर आवश्यक तेथे दुरुस्ती केली जाईल. संपकाळात वीजग्राहकांनी सहकार्य करावे.
- राजेश नाईक, अधीक्षक अभियंता वीज वितरण कंपनी.