एकूण १५,७७६ पुरुष मतदारांपैकी १२,६२७ मतदारांनी तर १४,६८४ स्त्री मतदारांपैकी ११,३३१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण २३,९५८ म्हणजे ७८.६४ टक्के मतदारांनी मतदान केले. उमरी ( चौ.) ग्रामस्थांनी ग्रामपंचायतसाठी सर्व सदस्य अविरोध निवडले. त्यामुळे तेथे मतदान घेण्याची गरज पडली नाही. तालुक्यातील कोसरा, ब्रम्ही, सावरला, भोजापूर, कन्हाळगाव, निष्ठी, वाही, नीलज येथील ग्रामपंचायत निवडणुकीकडे नागरिकांचे विशेष लक्ष लागले होते. मकरसंक्रांत सणामुळे कित्येक गावात मतदारांना चिवडा व तिळगुळाचे लाडू वितरित करण्यात आले. मात्र काही ग्रामपंचायतींसाठी उमेदवारात चुरस असल्याने महिला मतदारांना साडी-चोळी भेट देऊन आकर्षित करण्यात आले. सर्व उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद आहे. सोमवारी सकाळी १० वाजेपासून ९ टेबलवर मतमोजणी प्रारंभ होणार आहे. चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
ग्रामपंचायतींसाठी ७८.६४ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 4:30 AM