भंडारा : तालुक्यातील धारगाव परिसरात असलेल्या २०६ कोब्रा वाहिणीचा (बटालीयन) सातवा वर्धापन दिन काल सोमवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने विविधांगी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यात कार्यरत जवानांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे उद्घाटन २००६ कोब्रा बटालीयनचे वरिष्ठ अधिकारी राजीव कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी द्वितीय कमान अधिकारी संजीवकुमार यांच्या हस्ते उत्सव मेला याचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी राजपत्रित अधिकारी, बटालियनमध्ये कार्यरत अधिकारी, जवान, त्यांचे कुटूंबिय तसेच चितापूर, धारगाव, आमगाव आदी परिसरातील नागरिक उपस्थित होते. उत्सवात विविध खाद्य पदार्थांची दुकाने लावण्यात आली होती. त्याच बरोबर विविध स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते. सीआरपीएफ अंतर्गत कार्यरत २०६ कोब्रा बटालियनची स्थापना १ आॅगस्ट २००९ रोजी झाली असल्याची माहिती वरिष्ठ अधिकारी राजीवकुमार यांनी दिली. कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी जवान नेहमी तयार असतात. येथील जवानांनी छत्तीसगड राज्यातील सुकमा जिल्ह्यात झालेल्या नक्षलवादी कारवायांमध्ये सक्रीय सहभाग नोंदविला आहे, अशीही माहिती राजीवकुमार यांनी दिली. (प्रतिनिधी)
कोब्रा वाहिनीचा सातवा वर्धापन दिन उत्साहात
By admin | Published: August 03, 2016 12:44 AM