भंडारा : लावेश्वरजवळील सुरनदीमध्ये रेती तस्करी सुरू असल्याचे माहितीवरून ड्रोनच्या मदतीने टोहळणी करीत साध्या गणवेशातील तीन विभागाच्या सापळा धाडीत ८ ट्रॅक्टर पकडण्यात आले. ही कारवाई १ सप्टेंबरला सकाळी ७ वाजतादरम्यान करण्यात आली. पथकात महसूल व उपप्रादेशिक परिवहन व वरठी पोलीसांचा समावेश होता. पकडलेले आठही ट्रॅक्टर वरठी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे. यामुळे रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
जिल्ह्यात सर्वाधिक रेतीची तस्करी मोहाडी, तुमसर व भंडारा तालुक्यातील नदी घाट असलेल्या भागात होत असते. वैनगंगा नदी व सुर नदीतील रेतीवर तस्करांची नेहमीच नजर असते. येथील नदीची रेती दाणेदार व पांढरीशुभ्र असल्याने मागणी अधीक आहे. नागपूर शहराला येथील रेतीचा सर्वाधिक पुरवठा केला जातो.
वरठी पोलीस स्टेशन अंतर्गत लावेश्वर गावाजवळ सूर नदीचे पात्र आहे. या पात्रातून नेहमीच रेतीची तस्करी होते. रात्रंदिवस हा प्रकार सुरू असतो. याबाबतची गुप्त माहिती प्रशासनाला मिळाली. त्याआधारे पोलीस स्टेशन वरठी, महसूल विभाग भंडारा व उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या संयुक्त विद्यमाने रेती तस्करावर सापळा कारवाई करण्यात आली. कारवाईसाठी पहिल्यांदाच प्रशासनाचे वतीने ड्रोनची मदत घेण्यात आली. १ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजे दरम्यान ड्रोनच्या मदतीने टेहळणी करण्यात आली. तर पथकाकडून साध्या वेशात रेती तस्करावर पाळत ठेवण्यात आली.
त्यावेळी लावेश्वर रेती घाटावर ८ ते १० ट्रॅक्टर रेतीचोरी करीत असल्याची माहिती ड्रोनने पुरविली. त्याचवेळी साध्या गणवेशातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने धाड टाकली. एकाचवेळी आठ ट्रॅक्टर पकडण्यात यश आले तर दोन ट्रॅक्टर पळविण्यात आले. पकडलेले आठ ट्रॅक्टर वरठी पोलीस स्टेशनमध्ये जमा करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.१६ लाखाचा मुद्देमाल जप्त
ड्रोनच्या आधारे प्रशासनाचे वतीने टाकलेल्या धाडीत ८ ट्रॅक्टर पकडले गेले. यावेळी सर्व ट्रॅक्टरमध्ये रेती भरली होती. ८ ब्रास रेती व इतर साहित्य मिळून जवळपास १६ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.