वनविभागाची भरती : पोलीस प्रशासन व क्रीडा विभागाचे सहकार्यभंडारा : नागपूर प्रादेशिक वनविभागांतर्गत भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या चार उपवनसंरक्षक कार्यालयात असलेल्या रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेला आज सोमवारला प्रारंभ झाला आहे. भंडारा उपवनसंरक्षक कार्यालयाने सोमवारला गडेगाव लाकूड आगारात ही प्रक्रिया पहाटेपासून राबवित आहे. दरम्यान, पहिल्या दिवशी ८४४ उमेदवारांनी हजेरी लावली. नागपूर वनवृत्तांर्गत भंडारा, वर्धा, गोंदिया व नागपूर या उपवनसंरक्षक कार्यालयात रिक्त असलेल्या जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. १५६ जागांसाठी वनविभागाने अर्ज मागितले होते. यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून सुमारे ४८ हजार उमेदवारांनी अर्ज सादर केले. त्यापैकी १२ हजार उमेदवारांची चाचणी भंडारा उपवनसंरक्षक कार्यालयांतर्गत पार पडत आहे. सहा दिवस चालणाऱ्या या भरती प्रक्रियेत आजपासून शनिवारपर्यंत आलेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात येत आहे. ८४४ उमेदवारांमध्ये १९७ स्त्री प्रवर्गातील उमेदवार तर ६९७ पुरूष प्रवर्गातील उमेदवारांनी आज पहिल्या दिवशी हजेरी लावली. दरम्यान वनविभागाने भंडारा येथील भरती प्रक्रियेसाठी पहिल्या दिवसाकरिता दोन हजार उमेदवारांना बोलविले होते. मात्र एक हजार १५६ उमेदवारांनी या भरती प्रक्रियेकडे पाठ फिरविल्याने केवळ ८४४ उमेदवारांनी पहिल्या दिवशी भरती प्रक्रियेला हजेरी लावली. ही भरती प्रक्रिया सहा टेबलवर राबविण्यात आली. आज दिवसभर यात महिला व पुरूष उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात आली. (शहर प्रतिनिधी) वनविभागाने केली उमेदवारांसाठी व्यवस्थाभरती प्रक्रिया पहाटेपासूनच सुरू होणार असल्याने व थंडीच्या दिवसामुळे उमेदवारांना त्यापासून संरक्षण मिळावे यासाठी मंडप टाकण्यात आले होते. सोबतच पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली होती. भरती प्रक्रियेत आलेल्या उमेदवारांनाच आतमध्ये प्रवेश देण्यात आला. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपवनसंरक्षक उमेश वर्मा यांच्या मार्गदर्शनात वनकर्मचारी व पोलीस विभागाचे कर्मचारी तैणात करण्यात आले होते. उद्या दुसऱ्या दिवशी पहाटेपासूनच प्रक्रिया राबविण्यात येईल यासाठीही दोन हजार उमेदवारांना बोलविण्यात आले आहे.सहा टेबलवर राबविली प्रक्रियागडेगाव लाकूड आगारात वनविभागाची भरती प्रक्रिया राबविण्यात आली. यासाठी सहा टेबल लावण्यात आले होते. यावर तैणात अधिकाऱ्यांनी आलेल्या उमेदवारांची चाचणी प्रक्रिया राबविली. यात १९७ स्त्री उमेदवारांची उंची व वजन मोजले तर ६९७ पुरूष उमेदवारांची उंची, वजन व छाती मोजून त्यांना पुढल्या प्रक्रियेसाठी पात्र ठरविण्यात आले. ही प्रक्रिया पारदर्शकतेने पार पाडावी यासाठी पोलीस प्रशासनाचे तज्ज्ञ अधिकारी व क्रीडा विभागाचे अधिकारी बोलविण्यात आले होते. सोबतच ज्या उमेदवारांना आक्षेप नोंदवायचा होता त्यांच्याकरिता आक्षेप कक्षही होते. यात आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून उमेदवारांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.
पहिल्या दिवशी ८४४ उमेदवारांची हजेरी
By admin | Published: November 08, 2016 12:28 AM