भंडारा : खरीप हंगाम २०२४-२५ च्या पीक कर्ज वाटपास प्रारंभ झाला आहे. यंदा जिल्ह्यातील १ लाख ३५ हजार शेतकऱ्यांना ८७५ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. ३० एप्रिलपर्यंत ७३२७ शेतकऱ्यांना ४९ कोटी २५ लाखांचे पीक कर्ज वितरण झाले आहे. यात सहकारी बँकांनी ७०१२ शेतकऱ्यांना ४६ कोटी १७ लाखांचे कर्ज वितरण केले. केवळ ३१५ शेतकऱ्यांना ३ कोटी ८ लाखांचे वितरण राष्ट्रीयीकृत व अन्य बँकांनी केले. दरवर्षीप्रमाणे यंदाही राष्ट्रीयीकृत बँकांसह अन्य बँकांचा आडमुठेपणा कायम आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांची पीक कर्जासाठी धावपळ सुरू आहे.
भंडारा जिल्हा कृषिप्रधान जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्याचा मुख्य व्यवसाय शेती आहे. खरिपात सर्वाधिक रोजगारनिर्मिती याच क्षेत्रातून होत असते. शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना वर्षाला शून्य टक्के व्याजदरावर शेतीचा आकार व प्रकारानुसार पीक कर्ज दिले जाते. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळतो. शिवाय या कर्जाच्या परतफेडीतून शेतकऱ्यांना चांगला सिबिल (पत) तयार होण्यास मदत होते. शेतकऱ्यांना गरजेनुसार पीक कर्जाचा वापर करून शेतीसाठी लागणारी संसाधने, मजुरांवर खर्च करण्यास आर्थिक पाठबळ मिळते. परंतु मागील अनेक वर्षांपासून जिल्ह्यात सहकारी बँका शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असतांना राष्ट्रीयीकृत बँका मात्र शेतकऱ्यांना आपल्या दारात उभे करण्यास फारशा उत्सुक नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. हेच चित्र यंदाही वाटप झालेल्या पीक कर्जावरून दिसून येत आहे.
राष्ट्रीयीकृत बँकांचे उद्दिष्ट, कर्ज वाटप
बँक लक्षांक खातेदार वाटप (रक्कम लाखांत)बँक ऑफ बडोदा २२५४ ०० ००
बँक ऑफ इंडिया ३३९६ ४५ ३५बँक ऑफ महाराष्ट्र १२२८ १४१ ११४
कॅनरा बँक ४२५० ०० ००सीबीआय बँक १५९४ ०० ००
इंडियन बँक ८५५ ०० ००इं. ओव्हरसिस बँक ३३८ ०० ००
पंजाब बँक १७४ ०० ००एसबीआय ४१८८ ०० ००
यूको बँक १५ ०० ००युनियन बँक ९२४ ०० ००
एकूण १९२१६ १८६ १४९
सहकारी बँकांनी केलेले कर्ज वाटप
जिल्ह्यातील सहकारी बँकांना खरीप हंगामासाठी ५९८ कोटी २४ लाखांच्या पीक कर्जाचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. ३० एप्रिलपर्यंत सहकार क्षेत्रातील बँकांनी ७,०१२ शेतकऱ्यांना ४६ कोटी १७ लाखांचे पीक कर्ज वाटप केले आहे.
खासगी क्षेत्रातील बँकांची कामगिरी
खासगी क्षेत्रातील ॲक्सिस बँक, एचडीएफसी, आयसीआयसीआय, आयडीबीआय आदी बँकांना ४४ कोटी २९ लाख रुपयांचे उद्दिष्ट मिळाले. या बँकांनी आतापर्यंत १२९ शेतकऱ्यांना १ कोटी ५९ लाखांचे पीक कर्ज वाटप केले.
ग्रामीण बँकांची सुरुवातच नाही
जिल्ह्यातील ग्रामीण बँकांना ३९ कोटी ६१ लाखाच्या पीक कर्जाचे उद्दिष्ट देण्यात आले. परंतु त्यांनी आतापर्यंत पीक कर्ज वितरणाचा शुभारंभ केलेला नाही.
खरीप हंगामानिमित्त पीक कर्ज वितरणाला प्रारंभ झाला आहे. शेतकऱ्यांनी सहकारी बँकांसोबत राष्ट्रीयीकृत व अन्य बँकांतून पीक कर्जाचा लाभ घ्यावा. शेतकऱ्यांचा सिबिल योग्य असल्यास शेतीपूरक व्यवसाय व अन्य व्यवसायासाठी कर्ज साहाय्यता मिळू शकते.
- गणेश तईकर, अग्रणी बँक व्यवस्थापक, भंडारा.