राजू बांते लोकमत न्यूज नेटवर्क मोहाडी : सातही जिल्ह्यात फेब्रुवारी, मार्च व एप्रिल महिन्यात झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले. एकूण ४ हजार ५१.३० हेक्टर आर क्षेत्राची हानी झाली. या नुकसानीसाठी १० कोटी ३९ लाख २६ हजार २९८ रुपयांचा अपेक्षित निधी मंजूर करण्यात आला आहे.
भंडारा जिल्ह्यात एक फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी तसेच एप्रिल महिन्यात शेत पिकांची नैसर्गिक आपत्तीने खरीप पिकांची हानी झाली. भंडारा जिल्ह्यातील सातही तालुक्यात ४ हजार ५१.३० हेक्टर आर शेत पीक बाधित झाले होते. सर्वाधिक खरीप पिकाचे नुकसान तुमसर तालुक्यात १ हजार ५६८.६३ हेक्टर आर क्षेत्रात झाले. तर सर्वात कमी बाधित क्षेत्र ५१.८१ हेक्टर आर साकोली तालुक्याचे झाले होते. मार्च महिन्यात केवळ साकोली तालुक्यात ३३ शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे ८.९३ एवढे क्षेत्र बाधित झाले होते. त्याच्या नुकसानीची भरपाई २ लाख ४९ हजार ६६० रुपये दिली जाणार आहे.
सर्वाधिक शेत पिकांच्या नुकसानीचा निधी मोहाडी व तुमसर तालुक्यात दिला जाणार आहे. अवकाळी पाऊस गारपीट तसेच वादळामुळे ३३ टक्क्यावर बाधित पिकांच्या क्षेत्राची एकूण माहिती जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी अंतरिम केली आहे.
तालुका बाधित शेतकरी बाधित क्षेत्र (हेक्टर आर) भंडारा ५६८ ८३६.३८ मोहाडी ३५०८ १३८७.४१ तुमसर ३३५८ १५६८.६३ पवनी ४३९ १४५.३७ साकोली २७४ ५१.८१ लाखनी २७३ ६२.१८ लाखांदूर ०० ००
शासन स्तरावरून निधी आणण्यासाठी आमदार राजू कारेमोरे यांनी पाठपुरावा केला. त्यामुळे शासनाने खरीप पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना निधी मिळण्याच्या मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच त्यांच्या बँक खात्यावर निधी जमा केला जाणार आहे.