गोपालकृष्ण मांडवकर
भंडारा : लाखांदूर तालुक्यातील ढोलसर शेत शिवारात शुक्रवारी १६ जूनच्या पहाटे साडेचार वाजताच्या सकाळच्या सुमारास विकास शंकर नान्हे (२८, ढोलसर) हा युवक शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला. घरामागील शेतशिवारात पहाटे शौचास गेलेल्या एका महिलेला हा प्रकार दिसला. यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.
पोलीस सूत्रानुसार, घटनेच्या दिवशी सकाळच्या सुमारास गावातील एक महिला शेतशिवारात शौचास गेली असता मधुकर बेदरे यांच्या शेतातील कडुनिंबाच्या झाडाला विकासने लाल रंगाच्या दुपट्ट्याने गळफास घेतलेला दिसला. हा प्रकार पाहिल्यावर घाबरलेल्या अवस्थेत तिने कुटुंबियांना माहिती दिली. त्यानंतर कुटुंबियांनी सबंधितांना माहिती देऊन पोलिसात कळविले. लाखांदूरचे ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक अनिल मांदाळे, हवालदार विलास मातेरे, अंमलदार टेकचंद बुरडे, वाहनचालक भुपेश बावनकुळे यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि प्रेत ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले.
विलासने आत्महत्या कोणत्या कारणाने केली हे मात्र अद्याप कळु शकले नाही. तो आपली आई गोदावरी यांच्यासोबत गावातच राहत होता. आई आणि तो दोघेही मजुरीचे काम करायचे. दरम्यान, विकासला दारू पाणी पिण्याचे व्यसन लागले होते. अलिकडे त्याची प्रकृती नेहमी बिघडत असायची, अशी माहिती आहे. लाखांदूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून तपास सुरू आहे.