मोहन भोयर
भंडारा : मुंबई - हावडा रेल्वे मार्गावर तुमसर रोड रेल्वे स्थानकात दोन रेल्वे ट्रॅकमध्ये काली मातेचे जागृत मंदिर असून, चैत्र उत्सवात येथे भाविकांची मोठी गर्दी असते. ब्रिटिशांना या काली मातेने नतमस्तक होण्यास भाग पाडले होते, अशीही आख्यायिका येथे प्रचलित आहे. संपूर्ण भारतात दोन रेल्वे ट्रॅक दरम्यान असे मंदिर कुठेही नाही, हे विशेष.
सन १८५३ मध्ये भारतातील पहिली प्रवासी रेल्वे गाडी बोरीबंदर ते ठाणे अशी धावली होती. त्यानंतर मुंबई ते हावडा दरम्यान रेल्वे ट्रॅक घालण्याचे काम हाती घेण्यात आले. भारतातील प्रमुख रेल्वे मार्गांपैकी मुंबई - हावडा हा एक मार्ग मानला जातो. १९६८ किलोमीटर लांबीचा हा मार्ग आहे. नागपूर विभागात येथे ब्रिटिशांनी रेल्वे ट्रॅकचे बांधकाम हाती घेतले होते. दरम्यान, त्यांना दोन रेल्वे ट्रॅकच्या मधोमध एक मंदिर दिसले. त्याकाळी येथे केवळ काली मातेच्या नावाने दगड ठेवण्यात आले होते. त्या दगडाची तेथील परिसरातील भाविक रोज मनोभावे पूजा करीत होते. ब्रिटिश शासनाचे स्थापत्य अभियंता यांनी दगड हटविण्याचा निर्णय घेतला. नागरिकांनी त्यांना मोठा विरोध केला होता. त्या विरोधाला न जुमानता ब्रिटिशांनी अखेर ते दगड हटविण्याचा ठाम निर्णय घेतला.
क्रेनची केबल तुटली
ब्रिटिश स्थापत्य अभियंता मुंबई - हावडा रेल्वे मार्गावरील क्रेनच्या मदतीने काली मातेचे मंदिर भुईसपाट करण्याच्या निर्णय घेतल्यानंतर दोन मोठ्या क्रेन्स मंदिराजवळ येऊन उभ्या राहिल्या आणि काय आश्चर्य, त्या काली मातेच्या दगडांना दोन्ही क्रेन तसूभरही हलवू शकल्या नाहीत. त्यामुळे ब्रिटिश अधिकारी व त्यांचे ब्रिटिश अभियंता येथे हतबल झाले. शेवटी ब्रिटिश अधिकारी काली मातेसमोर नतमस्तक झाले. नवरात्र उत्सवात या मंदिरात दररोज भाविक मनोभावे पूजा करतात. महाप्रसादाचे येथे आयोजन वर्षातून एकदा केले जाते. या मंदिराला दूरवरून भाविक दर्शन घेण्याकरिता येतात. ब्रिटिशांना येथे नतमस्तक करणारी देवी म्हणूनच तिची प्रचिती आहे.