लोकमत न्यूज नेटवर्क साकोली : एका पक्षाला मतदान करण्यासंदर्भात त्याच पक्षातील एका दिव्यांग पदाधिकाऱ्याने आपल्या व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवले. यावरून साकोलीतील भाजप उमेदवाराच्या कार्यकर्त्याने जीवे मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ केल्याची तक्रार आहे. पोलिसांनी आपल्या तक्रारीची कोणतीही दखल घेतली नाही, असा आरोप दिव्यांग पदाधिकारी दिनेश कापगते यांनी पत्रकार परिषदेतून केला.
बोरगाव येथील दिनेश मिताराम कापगते यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, ते दिव्यांग असून, त्यांच्याकडे भाजपच्या दिव्यांग आघाडीची लोकसभेची जबाबदारी आहे. भारतीय किसान संघाचे ते जिल्हा महामंत्री म्हणून जबाबदारी सांभाळतात.
पक्षाने अन्य मतदारसंघात एका उमेदवाराला तिकीट दिल्याचे सांगत 'आपण मतदान करणार का' असे स्टेटस ठेवले. त्यावरून येथील भाजप उमेदवाराचे कार्यकर्ते असलेले एकोडी येथील देवा तरोणे यांनी दिनेशला मोबाइलवरून कॉल करून स्टेटस डिलीट करण्यास बजावले. अन्यथा जीवे मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ केली.
या प्रकरणी दिनेश यांनी १२ नोव्हेंबरला साकोली पोलिसांत तक्रार केली. मात्र ती दाखल करून घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली. नंतर पोलिसांनी त्याची तक्रार हाताने लिहून घेतली. मात्र त्यावर कोणतीही कारवाई केली नसल्याने आपल्या जीवाला धोका असल्याने पोलिसांनी न्याय द्यावा आणि संरक्षण द्यावे यावे, अशी मागणी दिनेश कापगते यांनी पत्रकार परिषदेतून केली.