लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आपल्या मामाच्या रेंगेपार (ता. तुमरसर) या गावातील घरी असलेल्या लग्नासाठी आलेला भाचा आस्तिक नंदकुमार दमाहे (१९) याचा वैनगंगेच्या डोहात बुडाल्याने मृत्यू झाला. मित्रांसोबत तो हौसेखातर नदीवर पोहण्यासाठी गेला होता. मात्र, ही दुर्घटना घडली. यामुळे लग्नघरी शोककळा पसरली आहे.
आस्तिक दमाहे हा बपेरा (ता. तुमसर) येथील आहे. त्याचे मामा रेंगेपार या गावी राहतात. त्यांच्याकडे लग्न असल्याने तो आई-वडिलांसह लग्नाला आला होता. दरम्यान, गुरुवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास काही मित्रांसोबत तो गावाच्या शेजारीच असलेल्या वैनगंगा नदीवर पोहण्यासाठी गेला होता. मात्र, डोहातील पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. तो बुडत असल्याचे पाहून मित्र घाबरले. त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. ती ऐकून शेजारी मासेमारी करणारे काही नागरिक मदतीला धावून आले. त्यांनी डोहातून आस्तिकला बाहेर काढले आणि उपचारासाठी सिहोरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर मृत घोषित केले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तुमसरच्या उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
आनंदावर विरजणमामाच्या घरी लग्न सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आलेल्या आस्तिकच्या दुर्दैवी मृत्यूने लग्नाच्या आनंदावर विरजण पडले. गावात आस्तिकच्या मृत्यूची माहिती पोहचताच दु:खाचे सावट पसरले. गावालगतच्या वैनगंगा नदीचे पात्र प्रतिबंधित करण्यात आले आहे, तरीही पात्रात हौशेपोटी आंघोळीसाठी गेलेल्या तरुणाला जीव गमवावा लागला.