पालांदूर (भंडारा) : लाखनी तालुक्यातील बेलाटी-पाचगाव येथील पुष्पामृत बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्थेतर्फे शासकीय धान खरेदीत अनियमितता करीत तब्बल ९९ लाख ३४ हजार ५९६ रुपयांची अफरातफर केली. याप्रकरणी जिल्हा पणन अधिकारी यांच्या तक्रारीनंतर या संस्थेच्या अध्यक्षांसह ११ संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वांना अटक करण्यात आली आहे.
शेतकरी वर्गाला शासकीय आधारभूत खरेदी केंद्राचा लाभ मिळावा, याकरिता जिल्ह्यात सातही तालुक्यात आधारभूत खरेदी केंद्र देण्यात आले. मात्र यात काही आधारभूत खरेदी केंद्रांनी जिल्हा पणन कार्यालयाचे निर्देश धुडकावत नियमांची पायमल्ली करण्यात आली.
लाखांदूर तालुक्यातील मात्र पालांदूर पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बेलाटी /पाचगाव येथील पुष्पामृत बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्थेने २०२१-२२ च्या खरीप व २०२२-२३ च्या रब्बी हंगामात ४ हजार ८१० क्विंटल धान खरेदी केले. मात्र पणन कार्यालयाला डीओच्या मार्फत १५६३.४० क्विंटलची उचल दिली. उर्वरित ३२४६.६० क्विंटल धानाची अफरातफर केली. शासकीय दराने याची किंमत ९९ लाख ३४ हजार ५९६ रुपये एवढी आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात आली होती. याबाबतची तक्रार खुद्द जिल्हा पणन अधिकारी यांनी दाखल केली होती. तपासांअती हे घबाड बाहेर आले. तपास ठाणेदार वीरसेन चहांदे, पोलिस नायक नावेद पठाण करीत आहेत.
हे आहेत संचालक
यात संस्थेचे अध्यक्ष मनोज अमृत चुटे (४५), सुखराम धोंडू बोरीकर (४५), हेमंत नरेंद्र शिवणकर (३५), गोरख नागोजी शिवणकर (४८), प्रफुल्ल विलास नागेश्वर (३०), मूर्तीकुमार शंकर कुकसे (३८), प्रदीप नानाजी चुटे (५०), लोकेश शेषराव बोरीकर (३०) सर्व रा. बेलाटी, नितीश लेखराम कुकसे (४६), रूपचंद किसन रोहनकर (५५), नंदलाल मुरलीधर दोनाडकर (३८) तिघेही रा. पाचगाव अशी ११ आरोपींची नावे आहेत. यांच्यावर भादंवि कलम ४२०, ४०९, ३४ अन्वये गुन्ह्याची नोंद घेण्यात आली.