भंडारा : मंडई उत्सवाच्या कार्यक्रमात हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना समजावून सांगण्यावरून झालेल्या वादात दोन गटात तुफान हाणामारी होण्याची घटना भंडारा तालुक्यातील सिल्ली येथे मंगळवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली. या हाणामारीत भंडारा पंचायत समितीच्या उपसभापतीसह चार जण गंभीर जखमी झाले. परस्परविरुद्ध तक्रारीवरून दोन्ही गटाच्या सात जणांवर कारधा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भंडारा तालुक्यातील सिल्ली येथे मंगळवारी मंडई कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री लावणी हंगामा हा कार्यक्रम सुरू होता. त्यावेळी कार्यक्रम बघण्यासाठी आलेल्या काही तरुणांनी हुल्लडबाजी करण्याचा प्रयत्न केला. त्यांना समजावण्यासाठी भंडारा पंचायत समितीचे उपसभापती प्रशांत खोब्रागडे आणि इतर चार जण गेले. सुरुवातीला त्यांच्यात शाब्दिक वाद सुरू झाला. त्यानंतर तुफान हाणामारी सुरू झाली. एकमेकांना लाठ्या-काठ्यांनी मारहाण करण्यात आली.
या मारहाणीत उपसभापती प्रशांत खोब्रागडे (५०), प्रशांत माकडे (३२) हे दोघे गंभीर जखमी झाले तर राजेंद्र साखरवाडे (४०) आणि आदेश देशमुख (१४) सर्व राहणार सिल्ली जखमी झाले. जखमींना रात्रीच भंडारा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रशांत खोब्रागडे यांच्या तक्रारीवरून कारधा पोलीस ठाण्यात ३२६, ३२४, १४३, १४७, १४९, ५०४, ५०६ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. एक विधिसंघर्षग्रस्त बालकावरही कारवाई करण्यात आली आहे.
दुसरीकडे कमलाकर अहिर रा.सिल्ली यांनी दिलेल्या तक्रारीवरून उपसभापती प्रशांत खोब्रागडे, प्रशांत माकडे, राजेंद्र साखरवाडे या तिघांवर भादंवि ३२३, ५०४, ५०६ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने सिल्ली येथे काही काळ प्रचंड तणाव निर्माण झाला होता. या घटनेची माहिती होताच कारधाचे ठाणेदार राजेशकुमार थोरात यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.
चार आरोपींना अटक
पंचायत समिती उपसभापती प्रशांत खोब्रागडे यांना मारहाण केल्याप्रकरणी आरोपी आशिष पडोळे (३२), कमलाकर अहिर (४५), अक्षय साखरवाडे (२२), निखिल पानबुडे (२४) या चौघांना कारधा पोलिसांनी अटक केली.