लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : ग्रामीण भागात एमबीबीएस डॉक्टर फिरकत नसल्याची बाब चिंताजनक आहे. त्यामुळे गावागावांत बोगस डॉक्टरांचे प्रस्थ वाढले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांकडे काही दिवस काम करणारे कम्पाउंडरच नंतर डॉक्टर म्हणून काम करताना दिसून येतात. उपचार स्वस्त दरात होत असल्याने रुग्णही त्यांच्याकडे गर्दी करतात. पण, या डॉक्टरांकडे कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची डिग्री किंवा रजिस्ट्रेशन नाही, असे असताना यांचा व्यवसाय धडाक्यात सुरू आहे. प्रशासन कारवाई करीत नसल्याने ग्रामीणच्या नाड्या बोगस डॉक्टरांकडून तपासल्या जात आहेत.
ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचे क्लिनिक धडाक्यात सुरू आहेत. यास कुणाचाही अडकाव नाही. एका प्राथमिक आरोग्य केंद्रात सरासरी १५ ते २० बोगस डॉक्टरांचा व्यवसाय सुरू आहे. प्रशासनाकडे बोगस डॉक्टरांची यादी आहे; परंतु कारवाई करणार कोण, असा प्रश्न अधांतरी आहे. जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्या वतीने साधी पडताळणी होत नाही, कारवाई तर दूरदूरपर्यंत होताना दिसत नाही. परंतु, बोगस डॉक्टरांच्या उपचारामुळे सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकदा विपरीत परिणाम होताना दिसून येतात.
बोगस डॉक्टरांचे ग्रामीणमध्ये थैमान जिल्ह्यातील प्रत्येक गावखेड्यात एकतरी दवाखाना बोगस डॉक्टरचा असल्याचे दिसून येते. गावातच दवाखाना उपलब्ध असल्यामुळे रुग्णही वैद्यकीय उपचार करून घेण्यासाठी यांनाच पहिली पसंती दर्शवितात. पण, डॉक्टर बोगस आहे की नाही, याची मात्र कोणीही शहानिशा करत नाही. यामुळे गावखेड्यात बोगस डॉक्टरांचे जणूकाही थैमानच सुरू असल्याचे दिसून येते. चांदसी, बंगाली डॉक्टरांनी परिसरातील गावांत जम बसविला आहे.
डिग्री अन् रजिस्ट्रेशनही नावालाच गावात उघडण्यात येणारे दवाखाने डॉक्टर विनाडिग्रीचे व कुठलेही रजिस्ट्रेशन न केलेले असल्याचे दिसून येतात. यामुळे हे डॉक्टर रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकतात.
सारा खेळ 'पेनकिलर'वर ! बोगस डॉक्टर कोणत्याही आजाराच्या रुग्णांना परतवून लावत नाहीत, यांच्याकडे सर्वच आजारांवरील औषधोपचार असतातच, तो औषधोपचार म्हणजे पेनकिलर गोळ्या. या गोळ्यांमुळे तात्पुरता आराम पडतो; पण आरोग्यासाठी मात्र अतिशय धोकादायक ठरू शकते.
दुर्धर आजार बरा केल्याचा दावा! आपला व्यवसाय जोमाने चालावा व अधिकाधिक पैसे कमविण्यासाठी आजकाल रुग्णांच्या जिवाशी खेळ चालविला जात आहे. इतकेच नव्हे तर बोगस डॉक्टर अनेक दुर्धर आजार बरे केल्याचाही दावा करतात. याला आजाराने ग्रस्त असलेले सुशिक्षितही बळी पडत असल्याचे चित्र आहे.
परप्रांतीय डॉक्टरांकडून तंबूत उपचार ! शहराच्या बाहेरील रिकाम्या भूखंडावर तसेच गावखेड्यात परप्रांतीय बोगस डॉक्टर आपला तंबू ठोकून रुग्णांना आयुर्वेदिकसह इतरही औषधोपचार करतात, याची कुठलीही हमी नसते. अशात हजारो रुपये औषधांच्या नावावर उकळले जात आहेत. एका ग्रॅमसाठी १० हजारांपर्यंत पैसे घेतले जात असल्याचे वास्तव आहे.
आधी कम्पाउंडर, नंतर डॉक्टर गावखेड्यातील परप्रांतीय बोगस डॉक्टर काही दिवस एखाद्या खासगी डॉक्टरकडे कम्पाउंडर म्हणून राहतात. नंतर विनाडिग्रीने आपलाच दवाखाना उघडून डॉक्टर बनून रुग्णांवर औषधोपचार करतात, असे चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे.
काहींवर झाली होती कारवाईगतवर्षीपूर्वी आरोग्य विभागाच्या वतीने बोगस डॉक्टरांची तपासणी मोहीम राबविण्यात आली होती. यात काहींवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.मात्र, पुढे त्यांनी सुटका करून घेत पुन्हा व्यवसाय थाटल्याचे दिसून येत आहे. यात काहींना विनाकारण त्रास सहन करावा लागला होता.