भंडारा : रंगपंचमीच्या दिवशी धुळवड साजरी करून दुपारच्या सुमारास वैनगंगा नदी पात्रात अंघोळीसाठी उतरलेल्या एका युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना सोमवारी, २५ मार्च रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील दोनाड येथील वैनगंगा नदी पात्रात घडली. नितेश तेजराम बर्डे (२५) असे मृताचे नाव असून तो कुडेगाव येथील रहिवासी आहे.
पोलिस सूत्रानुसार, सकाळी धुळवडीचा कार्यक्रम आटपून तेजस आपल्या लहान भावासह गावातील काही युवकांसोबत दुपारच्या सुमारास नदीपात्रात आंघोळीसाठी गेला होता. दरम्यान, आंघोळीसाठी नदीपात्रात उतरल्यावर पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात बुडाला. तो बुडत असल्याचे लक्षात येतात अन्य युवकांनी आरडाओरड केली. यावेळी नदीपात्रात डोंगा हाकत असलेल्या एका नावाड्याने घटनास्थळी धाव तेजसचा मृतदेह पाण्याबाहेर काढला.
नावाड्याच्या मदतीने युवकांनी तातडीने उपचारार्थ लाखांदूर येथील एका खाजगी दवाखान्यात नेले. मात्र उपचारापूर्वीच युवकाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले यामुळे. युवकांनी मृतदेह मृतकाचे घरी पोहोचविला . या घटनेची माहिती मृताच्या कुटुंबीयांनी लाखांदूर पोलिसांना कळविली, त्यावरून ठाणेदार सचिन पवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक परमेश्वर आगासे, पोलीस नायक सुभाष शहारे, पोलिस अंमलदार जितेंद्र खरकाटे आदी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. या घटनेत लाखांदूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करीत पुढील तपास सुरू केला आहे.