लाखांदूर (भंडारा) : एमबीबीएस पूर्ण करून इंटर्नशीप करणाऱ्या डॉक्टरने तलवात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील पिंपळगाव (को.) येथील जंगल परिसरात शुक्रवारी सकाळी ९ वाजता उघडकीस आली. गुरुवारी सायंकाळी व्यायामासाठी जात असल्याचे सांगून तो बाहेर गेला होता. त्याच्या आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही.
दुर्वास नाजूक नाकाडे (२२) रा. पिंपळगाव ता. लाखांदूर असे मृत डॉक्टरचे नाव आहे. त्याने पुणे येथील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस पूर्ण केले हाते. सध्यात तो इंटर्नशीप करीत होता. दिवाळी सणासाठी चार दिवसांपूर्वी तो पिंपळगाव येथे घरी आला. गुरुवारी सायंकाळी व्यायाम करण्यासाठी जात असल्याचे कुटुंबीयांना सांगून सायकलने घराबाहेर पडला. मात्र रात्री उशिरापर्यंत घरी आला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. मात्र थांगपत्ता लागला नाही. रात्रीच कुटुंबीयांनी लाखांदूर ठाणे गाठून डाॅक्टर बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.
दरम्यान शुक्रवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास बेपत्ता डॉ. दुर्वासचा मृतदेह गावातील तलावात तरंगताना आढळून आला. ही माहिती लाखांदूर पोलिसांना देण्यात आली. त्यावरून ठाणेदार रमाकांत कोकाटे, पोलीस उपनिरीक्षक अनिल मांदाडे, पोलीस नाईक दुर्योधन वकेकार, संदीप बावनकुळे, अविनाश खरोले यांनी घटनास्थळ गाठले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला. तसेच आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.