मोहाडी (भंडारा) : माझ्या पाडसाला कुणीतरी आणून सोडेल, ही आशा घेऊन हरिणी पांढरागोटा येथे सूर्याच्या मावळतीला आली. भिरभिरत्या नजरेने पाडसाचा शोध घेऊ लागली. अंधार पडताच वन कर्मचाऱ्यांनी पाडसाला सोडले अन् आई दिसताच पाडस दुडूदुडू धावत गेले. श्वानांच्या हल्ल्याने दुरावलेल्या हरिणी आणि पाडसाची अखेर भेट झाली. आपल्या पाडसाला घेऊन जंगलात हरिणी दिशेनाशी झाली. वन कर्मचाऱ्यांसह गावकऱ्यांच्याही चेहऱ्यावर यामुळे समाधानाचे भाव उमटले. यानंतर वन कर्मचारी तिथून निश्चिंत माघारी फिरले.
वनक्षेत्र सोडून अनेकदा हरणे नागरी वाड्या, वस्त्या व शेतांकडे भरकटतात. असाच एक हरणांचा कळप शुक्रवारी मोहगाव देवी येथील पांढरागोटा परिसरात दिसून आला होता. त्या शिवारात श्वानांची एक मोठी झुंड हरणांच्या पाठीमागे लागली. यावेळी जीवाच्या आकांताने सैरभर होत धावणारे पाडस शेतकऱ्यांच्या नजरेस पडले. श्वानांची झुंड दिसताच शेतकऱ्यांनी त्यांना पिटाळून लावले. त्या पाडसाला श्वानांच्या तावडीतून सोडवले. पाडसाची श्रीकांत झोडे व त्यांच्या मुलांनी देखरेख केली. वन कर्मचारीसुद्धा मोहगाव देवीला आले होते. सायंकाळी पाडसाला हरणीच्या कळपात सोपविण्यासाठी येतोय, असं सांगून ते निघून गेले होते.
वनक्षेत्र अधिकारी दीपक वानखेडे, वनरक्षक सोमेश्वर बघेले, नीलेश साखरवाडे हे सायंकाळी मोहगाव देवीला आले. पाडसाला घेऊन पांढरागोटा येथील हिरालाल आंबीलकर यांच्यासोबत शिवारात आले. पाडसाला कुणीतरी सोडेल, या आशेने हरणांचा कळप तेथे आला. अंधार पडलेला होता. दूरवरून कळपातील पाडसाची आई बघत होती. कळपातील एक हरीण पुढे-पुढे येत असल्याचे वन अधिकाऱ्यांनी पहिले. त्यांनी त्या पाडसाला त्या शिवारात सोडले. पाडस आपल्या आईकडे व हरिणी आपल्या पिल्लाकडे येत होती. पाडस अन् ती हरीण काहीवेळाने आपल्या कळपात सहभागी झाल्याचे बघून वन कर्मचारी माघारी फिरले. पाडसाची आईपासून झालेली ताटातूट वन अधिकाऱ्यांनी दूर केली.