दयाल भोवते
लाखांदूर (भंडारा) : आतापर्यंत शेतशिवारात धुमाकूळ घालणाऱ्या हत्तींनी प्रथमच गावात प्रवेश करून तीन घरांच्या भिंती पाडून तोडफोड केली. ही घटना लाखांदूर तालुक्यातील दहेगाव माईन्स येथे मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. घटनेची माहिती होताच वन कर्मचाऱ्यांनी गावात धाव घेऊन हत्तींना जंगलाच्या दिशेन पिटाळून लावले. या प्रकाराने तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.
दोन दिवसांपासून जंगली हत्तीचा कळप लाखांदूर तालुक्यातील जंगलात मुक्कामी आहे. सोमवारी मालदा जंगल परिसरात धुडगूस घातला. दिघोरी मोठी येथील तीन शेतकऱ्यांचे धानाचे ढीग उद्ध्वस्त केले. आतापर्यंत जंगल आणि शेतात धुमाकूळ घालणारा हत्तींचा कळप मंगळवारी मध्यरात्रीच्या दहेगाव येथे शिरला. यामुळे गावात एकच खळबळ उडाली. गावकऱ्यांनी या घटनेची माहिती गस्तीवर असलेल्या वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली. त्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठत हत्तींच्या कळपाला जंगलाच्या दिशेने पिटाळले. मात्र तोपर्यंत हत्तींनी निताराम कुंडलिक करणकर, रामा यादवराव इरपाते व विठ्ठल जना कुंभरे यांच्या घरांच्या भिंती पाडल्या. त्यात मोठे नुकसान झाले. लाखांदूर वनविभागाच्या पथकाने रात्रभर जंगल परिसरात गस्त लावली होती.
थोडक्यात बचावला दिव्यांग वृद्ध
मध्यरात्रीच्या सुमारास जंगलातून गावात शिरलेल्या हत्तींच्या काळपाने दहेगाव येथील रामा यादवराव इरपाते (७०) यांच्या घराची भिंत पाडली. त्यावेळी भिंतीला लागूनच दिव्यांग असेलेले रामा खाटेवर झोपले होते. सुदैवाने वृद्धाच्या मुलाने आरडाओरडा केल्याने हत्ती पळून गेले. सुदैवाने रामा यांना कोणतीही दुखापत झाली नाही.