भंडारा : येवळच असलेल्या ठाणा पेट्रोलपंप येथील रहिवासी डॉ. शशिकांत कृष्णराव तांदूळकर (५४) हे वडीलाच्या घरी पूजेकरिता गेले होते. या दरम्यान रात्री ९:४० वाजता सुमारास घराला अचानक आग लागली. यात जीवनावश्यक वस्तुंची राखरांगोळी झाली. प्राथमिकदृष्ट्या यात चार लाखाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. शॉर्टसर्किटने ही घटना घडल्याचा संशय व्यक्त होत आहे.
डॉ. शशिकांत तांदुळकर हे ठाणा पेट्रोल पंप गावातील हनुमान वार्ड क्रमांक एक मध्ये राहतात. जवाहरनगर रोडवर असलेल्या त्यांच्या घरी स्वत:चा दवाखाना आहे. तर वरच्या माळ्यावर ते वास्तव्यात राहत होते. लक्ष्मीपूजनानिमित्त आपल्या घरातील पूजा आटोपून घरामागेच १०० मीटर फर्लांग अंतरावर असलेल्या वडिलांच्या घरी रात्री पुजेसाठी गेले होते. दरम्यान ९:४० वाजता सुमारास त्यांच्या घराला अचानक आग लागली. आगीने आपले रौद्ररूप धारण केले होते. त्यांनी घरी पोहचून दार उघडले.
शेजारी असलेले वृषभ कुर्जेकर यांनी समय सूचकता दाखविता घरातील विद्युत प्रवाह खंडित केला. जवळच्या बोरवेल पाईपद्वारे आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पोलिस पथक आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी तलाठी दीपाली भिवगडे, पंचायत समिती सदस्य कल्पना कुर्जेकर, ग्रामपंचायत सदस्य निखिल तिजारे, जितेंद्र पडोळे, यांच्यासमक्ष पंचनामा करण्यात आला. यात जीवनावशक वस्तू, विद्युत उपकरण, फर्निचर असे एकंदरीत, चार लाखाचे नुकसान झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.