भंडारा : रात्री शेतातील विहिरीत पडलेल्या बिबट्याला अतिजलद बचाव दलाच्या पथकाने ३० फुट खोल विहीरीतून सुखरूप बाहेर काढले. तालुक्यातील मोहघाटा येथील शेतकरी वासुदेव बेनिराम भांडारकर यांच्या शेतशिवारात ही घटना घडली. विशेष म्हणजे या बिबट्याने विहीरीतील गोल कड्यावर बसून रात्र काढली.
वन विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री हा बिबट तोल जाऊन विहीरीत पडला. बाहेर निघता न आल्याने रात्रभर तो आतील गोल कड्यावर बसून राहीला. मंगळवारी (२ एप्रिल) सकाळी शेतात गेलेल्या शेतकऱ्यांच्या ही घटना लक्षात आली. त्यांनी साकोली वनविभागाच्या कार्यालयाला माहिती दिल्यावर अति जलद बचाव दलाच्या जवानांनी घटनास्थळ गाठले. हा बिबट विहिरीत गोल कड्यावर बसलेला होता. आत लोखंडी पिंजरा दोरखंडाच्या साह्याने सोडल्यावर बिबट्याने पिंजऱ्यात प्रवेश केला. त्यानंतर पिंजर्याचे गेट बंद करून दोरखंडाने हा पिंजरा सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आला.
या बिबट्यावर साकोली येथील सहाय्यक वनसंरक्षक कार्यालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. तो पूर्णपणे चांगला झाल्यावर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे साकोली येथील सहाय्यक वनसंरक्षक कार्यालयाचे व सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी रोशन राठोड यांनी सांगितले. या मोहिमेत सहाय्यक वनसंरक्षक रोशन राठोड, वनपरीक्षेत्रअधिकारी मनीषा चव्हाण, लाखनीचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुरज गोखले तसेच अति जलद बचाव दल प्रमुख तथा भंडाराचे वनपरीक्षेत्राधिकारी संजय मेंढे, क्षेत्र सहाय्यक सुनील खांडेकर, क्षेत्र सहाय्यक उके, गस्ती पथक प्रमुख गुरबेले आदींचा सहभाग होता.