भंडारा : तुमसर तालुक्यातील लेंडेझरी वनपरिक्षेत्रातील बपेरा आंबा गड गाव शिवारातील बावन थडी वितरिकेतील पाण्यात एक पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळला. ही घटना गुरुवारी संध्याकाळी चार ते पाच च्या सुमारास उघडकीस आली त्यामुळे परिसरातील नागरिकांनी एकच मोठी गर्दी घटनास्थळी केली. या घटनेमुळे वन विभाग खडबडून जागा झाला असून वाघाच्या मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप गुढ आहे. पट्टेदार वाघाच्या मृत्यूबाबत नागपूर येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्याची माहिती आहे.
लेंडेझरी वनपरिक्षेत्र हे सातपुडा पर्वत अंगात असून संपूर्ण जंगल हे घनदाट आहे या घनदाट जंगलातून बावनथडी प्रकल्पाचा मुख्य कालवा व वितरिका जातात. उन्हाळ्यात यावेळी तरीकेतुन पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. बापेरा अंबागड शिवारात पाण्याच्या विसर्ग सुरू असतानाच एक पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळला. परिसरातील नागरिकांना हा वाघ पाण्यात दिसल्यानंतर त्यांनी याबाबत वन विभागाला माहिती दिली त्यानंतर वन विभागाचे स्थानिक अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी याबाबत नागपूर येथील वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. रात्री किंवा उद्या सकाळी सदर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल होणार असल्याची माहिती आहे.
वाघाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप गुलदस्त्यात आहे. वाघाला तहान लागली असावी व तो पाणी पिण्याकरिता वितरीकेत गेला असावा त्यानंतर त्याला बाहेर निघता आले नसावे व शेवटी त्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. लेंडेझरी वनपरिक्षेत्र हे मध्य प्रदेशाला लागून आहे. मध्यप्रदेशातील शिकारी टोळ्या दरवर्षी उन्हाळ्यात जंगलात दाखल होतात त्यांनी घातपात तर केला नाही ना अशी शंका उपस्थित होत आहे. शवविच्छेदनानंतरच वाघा चा मृत्यू कशामुळे झाला हे कडणार आहे. वाघाच्या मृत्यूमुळे मात्र वन विभागात एकच खळबळ माजली आहे.