भंडारा :भंडारा वनक्षेत्रातील सहवनक्षेत्र दवड़ीपार, नियतक्षेत्र गराडा येथील कक्ष क्रमांक २५३, नविन राखीव वनामध्ये एक बिबट २९ जानेवारी रोजी वनकर्मचाऱ्यांना मृताअवस्थेत आढळून आला. मृत बिबट हा नर असून त्याचे वय अंदाजे २ वर्षाचे आहे.
वन कर्मचाऱ्यांनी तात्काळ भंडारा वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मेंढे यांना दिली. त्यांनी तातडीने पथकासह घटनास्थळ गाठले. त्यानंतर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या प्रमाणभूत कार्यपद्धतीनुसार या घटनेची माहिती भंडारा जिल्ह्यातील मानद वन्यजीव रक्षक शाहिद खान, मानद वन्यजीव नदीम खान व पंकज देशमुख यांना देण्यात आली.
मृत बिबटाच्या अवयवांचे नमुने उत्तरीय तपासणी करिता न्याय वैद्यकिय प्रयोगशाळेस पाठविण्यात येणार आहेत. संपूर्ण कार्यवाही उपवनसंरक्षक भंडारा श्री.राहुल गवई यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक भंडारा श्री.सचीन निलख व वनपरिक्षेत्र अधिकारी भंडारा श्री. संजय मेंढे हे करीत आहे.
गडेगाव आगारात शवविच्छेदन
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणच्या प्रमाणभूत कार्यप्रणालीनुसार मृत बिबट्याचे शव गडेगाव आगार येथे हलविण्यात आले. मानेगाव येथील पशुधन विकास अधिकारी विट्ठल हटवार व पहेला येथील पशुधन विकास अधिकारी शुभम गुरवे, आसगावचे पशुधन विकास अधिकारी पंकज कापगते यांनी घटनास्थळी दाखल होत शवाची उत्तरीय तपासणी केली.
अवयव साबूत, मानेवर व तोंडावर जखमा
पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत बिबटाची पहाणी केली असता त्याचे सर्व अवयव शाबूत असल्याचे निदर्शनास आले. मृत बिबट्याच्या मानेवर व तोंडावर जखमा आढळून आल्या आहेत. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी बिबट्याचा मृत्यू हा इतर वन्य प्राण्याच्या हल्यात झाल्याचा अंदाज व्यक्त केला.