भंडारा : भारतीय सैन्य दलात दिल्ली येथे कर्तव्य बजावताना सुरेश परसराम मसरके (३१) या जवानाला डेंग्यू झाला. त्यांच्यावर दिल्ली येथील सैनिक रुग्णालयात आठ दिवसापासून उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांच्या बुधवारी पहाटे ४:३० च्या दरम्यान मृत्यू झाला.
सुरेश परसराम मसरके हे मुळचे देव्हाडी (ता. तुमसर) येथील आंबेडकर वार्डातील रहिवासी असून त्यांच्या मृत्यूचे वृत्त धडकताच गावात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी ११ वाजता माडगी येथील स्मशान घाटावर शासकीय ईतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
सुरेश मसरके हे भारतीय सैन्य दलात नायक या पदावर कार्यरत होते. २०१२ मध्ये ते भारतीय सैन्य दलात दाखल झाले होते. आठ दिवसापूर्वी त्यांना डेंग्यू आजाराची लक्षणे दिसून आली. त्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना दिल्ली येथील लष्कराच्या रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान त्यांची प्रकृती खालावली, दरम्यान बुधवारी पहाटे त्यांचे निधन झाले.
दोन वर्षांपूर्वीच झाला होता विवाह
दोन वर्षांपूर्वी सुरेश यांचे लग्न झाले होते. त्यांना आई, वडील, तीन भाऊ व दोन बहिणी आहेत. त्यांच्या एक भाऊ सैन्य दलात आहे.
विशेष विमानाने येणार पार्थिव
दिल्ली येथून सुरेश यांचे पार्थिव विशेष विमानाने नागपूर येथे येणार आहे. त्यानंतर लष्कराच्या गाडीतून त्यांचे पार्थिव देव्हाडी येथील त्यांच्या स्वगृही आणण्यात येणार आहे, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली. गुरुवारी सकाळी ११ वाजता माडगी येथील स्मशान घाटावर शासकीय इतमामात करण्यात येतील.