गोपालकृष्ण मांडवकर, लोकमत न्यूज नेटवर्क, भंडारा: शहरातील वर्दळीचा चौक असलेल्या राजीव गांधी चौकात दुचाकीवरून जाणाऱ्या बहीण भावाला भरधाव टिप्परची धडक बसली. यात अफसाना शेख (३५) या महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर तिचा भाऊ कलीम शेख (४०) यांच्या पायाला जबर दुखापत झाली. अपघातानंतर शेकडोंच्या संख्येतील संतप्त जमाव घटनास्थळी पोचला. मात्र पोलिसांच्या समसूचकतेमुळे पुढील अनर्थ टाळला. ही घटना रात्री सव्वा दहा ते साडेदहा वाजताच्या दरम्यान घडली.
एमएच ३६ एए ३३८१ क्रमांकाचा टिप्पर गिट्टी घेऊन तुमसरकडे जात होता. राजीव गांधी चौकातून एमएच ३६ टी ९८०१ क्रमांकाच्या दुचाकीवरून अफसाना आणि कलीम हे दोन्ही बहिण भाऊ रुग्णालयातून घरी जात होते. दरम्यान या चौकातील वळणावर टिप्परने दुचाकीला उडविले. या दोघांनाही दुचाकीसह सुमारे २० फूट घासत नेले. यात अफसाना शेख या महिलेचा मृत्यू झाला. तर कलीम शेख याच्या पायाचा अक्षरशः चुरा झाला.
अपघात घडला तेव्हा चौकात बरीच गर्दी आणि वर्दळही होती. योगायोगाने समोरून येणाऱ्या एका पोलिसांच्या वाहनाला हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तातडीने आपल्या वाहनातून या दोघांनाही एका खाजगी रुग्णालयात पोहोचले. तिथे डॉक्टरांनी अफसाना यांना मृत घोषित केले.दरम्यान, अपघातानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या टिप्पर चालकाला जमावाने मारहाण केली. त्याने जवळच असलेल्या पोलीस ठाण्यात धाव घेतली. चालकाचे नाव कळू शकले नाही.
अपघातानंतर तणाव
या अपघाताची माहिती पसरतात शेकडोंच्या संख्येने जमाव चौकात पोहोचला. टिप्परवर दगडफेक करण्याचाही प्रयत्न झाला. मात्र पोलिसांनी तातडीने धाव घेऊन गर्दी पांगविली. जादा पोलीस कुमक मागवून टिप्पर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला. घटनास्थळाला जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी बागुल यांनी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. रात्री उशिरापर्यंत पोलिसांचा बंदोबस्त चौकात तैनात होता.