सिराज शेख
मोहाडी (भंडारा) : वाघ बघण्याच्या नादात गावकऱ्यांनी शेतातील मिरची, चवळी, टोमॅटो, पोपटी आणि वांग्याचे पीक अक्षरश: पायदळी तुडविले. मोहाडी तालुक्यातील मांडेसर येथील शेतात तब्बल आठ तास हजारो बघ्यांची गर्दी झाल्याने दोन शेतकऱ्यांचे सुमारे आठ लाख रुपयांचे नुकसान झाले. या शेतकऱ्यांवर कृत्रिम संकट ओढवले असून जमिनीवर झाेपलेले पीक पाहून कुणाला दोष द्यावा, असा प्रश्न पडला आहे.
मोहाडी तालुक्यातील मांडेसर येथील बालचंद दमाहे यांच्या शेतात बुधवारी वाघ आल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. वाघोबाचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांच्या झुंडीच्या झुंडी शेताकडे धावू लागल्या. कुणी पायी तर कुणी दुचाकीने शेत गाठत होते. अवघ्या दोन तासांत या शेतात हजारोंची गर्दी झाली. एका झुडुपात लपून असलेला वाघ नागरिकांच्या कोलाहलाने घाबरला. तो शेतातील एका झुडपातून बाहेर आला. त्याच वेळी घाबरगुंडी उडाल्याने गावकरी सैरावैरा पळू लागले. त्यानंतर गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापरही केला. या धावपळीत बालचंद दमाहे आणि शेजारी असलेल्या मांगो सव्वालाखे यांच्या शेतातील पीक तुडविले. त्यात मिरची, चवळी, टोमॅटो, पोपटी, वांग्याचे रोपटे जमीनदोस्त झाले. दोघांचे प्रत्येकी दोन लाखांचे असे एकूण चार लाखांचे नुकसान झाल्याचा आंदाज आहे.
लागवडीला येतो ३ लाखांचा खर्च
मांडेसर, खमारी, पंढराबोडी आदी भागात मिरची, वांगे, वाल, चवळी, टोमॅटो इत्यादी प्रकारच्या भाजीपाल्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. याची लागवड जुलैमध्ये केली जाते. दोन महिने मशागत केल्यानंतर पीक हातात येते. लागवडीसाठी दोन ते तीन लाख रुपये खर्च येतो. सध्या भाजीपाला तोडणीचा हंगाम सुरू आहे. मात्र, लोकांनी उभ्या पिकातून येणे-जाणे केल्याने पिकाचे नुकसान झाले आहे.
नागरिकांनी वाघ पाहण्यासाठी शेतात मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना वनविभागाने नुकसानभरपाई द्यायलाच हवी.
- गुलाब सव्वालाखे, सरपंच, मांडेसर