भंडारा : भंडारा वनविभाग अंतर्गत येणाऱ्या लेंडेझरी वनक्षेत्रातील लेंडेझरी नियतक्षेत्रात वन कर्मचाऱ्यांना वनगस्ती दरम्यान नर वाघ मृत अवस्थेत आढळून आला. दोन वाघांच्या झुंजीत हा प्रकार घडला असावा, असा अंदाज वर्तविला जात आहे. लेंडेझरीच्या राखीव वनातून जाणाऱ्या लेंडेझरी-विटपूर रस्त्याच्या बाजुला १० मिटर अंतरावर झुडपात बुधवारी सायंकाळी ५:४५ वाजताच्या दरम्यान हा प्रकार उघडकीस आला.
या संदर्भात उपवनसंरक्षक (प्रादेशिक) राहूल गवई, गडेगाव आगराचे प्रकाष्ट नियतन अधिकारी साकेत शेंडे, मानद वन्यजीव रक्षक शहीद खान यांना कळविताच पशुधन विकास अधिकारी डॉ. बारापात्रे तसेच अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मृत वाघाची वैद्यकीय तपासणी केली असता अर्व अवयव शाबूत दिसले. रात्रीची वेळ असल्यामुळे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या कार्यपध्दतीनुसार मृत वाघाचे शरीर लंडेझरी वनपरिक्षेत्र कार्यालयात नेऊन उत्तरणीय तपासणी दुसऱ्या दिवशी गुरूवारी करण्यात आली.
मृत वाघाचे वय सुमारे ४ ते ५ वर्षाचे आहे. प्राथमिक तपासणीत वाघांच्या झुंजीत त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज असला तरी मृत्यूचे कारण शव विच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. मृत वाघाचा व्हिसेरा उत्तरीय तपासणीकरिता पाठवण्यात आला आहे. मृत वाघावर अंत्यसंस्कार
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या कार्यपध्दतीनुसार समिती गठित करुन वैद्यकीय तपासणी करण्यात आली. शव विच्छेदनानंतर तिथेच अग्नीसंस्कार करण्यात आले.