गोपालकृष्ण मांडवकर
भंडारा : तुमसर तालुक्यातील खंदाड या गावातील एका शेतामध्ये वाघ मृतावस्थेत आढळल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती कळताच पोलिस आणि वन विभागातील वरीष्ठ अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहेत.
तुमसरवरून २८ किलोमीटर अंतरावरील वन परीक्षेत्रालगतच्या धानाच्या शेतीमध्ये बुधवारी (१६ ऑगस्ट) सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास गस्त घालणाऱ्या वनरक्षकांना जनावराच्या मृतदेहाचा कुजल्याची दुर्गंधी आली. त्यांनी शोध घेतला असता धानाच्या एका शेतामध्ये झाडांच्या फांद्यांनी झाकून ठेवलेला वाघाचा मृतदेह आढळला. त्यांनी संबंधित शेतकऱ्याकडे विचारणा केली असता, तीन दिवसांपूर्वी या मृत वाघाला झाडाच्या फांद्यांनी झाकून ठेवल्याची कबुली दिली. प्रत्यक्ष घटनास्थळाच्या पहाणीकरून आठ ते १० दिवसांपूर्वीच वाघाचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वन विभागाने वर्तविला आहे.
या प्रकरणी पोलिस आणि वन विभागाचे पथक तपास करीत असून अद्याप कोणालाही ताब्यात घेतलेले नाही. वाघाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तथापि, आपल्या शेतात वाघ मरून पडलेला दिसला. भीतीपोटी आपण त्याला झाकून ठेवल्याची कबुली संबंधित शेतकऱ्याने दिल्याची प्राथमिक माहिती आहे.