लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : मळणी करताना ट्रॅक्टरमधून उडालेल्या ठिणगीने लागलेल्या आगीत तीन एकरातील धानासह ट्रॅक्टर आणि मळणी यंत्र जाळून खाक झाल्याची घटना तालुक्यातील सरांडी बुज. येथे शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. उपस्थित शेतकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र वेगाने पसरलेल्या आगीत सर्व जळून गेले. यात सुमारे १५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.सरांडी येथील शेषराव समरीत यांच्या शेतातील धानासह दिनेश ठाकरे यांच्या मालकीचे ट्रॅक्टर होते. शेतकरी शेषराव समरीत यांची चार एकर शेती आहे. खरिपात लागवड केलेल्या धानाची काही दिवसापूर्वी कापणी करून पुंजणे बांधून शेतात ठेवले होते. शनिवारी त्यांच्या शेतात मळणीसाठी दिनेश ठाकरे यांचे ट्रॅक्टरवरील मळणी यंत्र आणले. धानाच्या गंजीजवळ मळणी यंत्र लावून धानाची मळणी सुरू केली. सुमारे एक एकरातील धानाची मळणी होऊन ५० पोते धान काढण्यात आले. मळणी सुरू असातना अचानक ट्रॅक्टरमधून उडालेली ठिणगी धान पुंजण्याच्या ढिगावर पडली. काही कळायच्या हात आग लागली. उपस्थित शेतकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग वेगाने पसरल्याने काही वेळातच धान पुंजणे, मळणी आणि ट्रॅक्टर जळून खाक झाला. या घटनेची माहिती होताच गावकऱ्यांनी शेतात धाव घेतली. यात १५ लाखांचे नुकसान झाले असून, शासनाने शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याची मागणी आहे.
आठवडाभरात तालुक्यातील दुसरी घटना- धानाची मळणी करताना आग लागण्याची आठवडाभरातील तालुक्यातील ही दुसरी घटना आहे. १२ नोव्हेंबर रोजी तालुक्यातील रोहनी येथे आनंदराव समरीत यांचे धान पुंजणे, ट्रॅक्टर व मळणी यंत्र जळून खाक झाले होते. आगीच्या घटनांनी शेतकरी धास्तावले आहेत.