लाखांदूर (भंडारा) : शेतीमाल विक्रीसाठी घेऊन जाणार ट्रॅक्टर पुलावरून ३० फूट खोल चूलबंद नदीपात्रात कोसळल्याने झालेल्या अपघातात एकजण ठार, तर दोनजण गंभीर जखमी झाले. हा अपघात लाखांदूरपासून जवळच असलेल्या शिव मंदिराजवळील पुलावर गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडला. मागाहून आलेल्या टिप्परला साईड देताना चालकाचे नियंत्रण गेल्याने अपघात घडल्याचे सांगण्यात आले.
अण्णा रामचंद्र पारधी (वय ५०, रा. सावरगाव, ता. लाखांदूर) असे मृताचे नाव आहे, तर राधेश्याम मधुकर ढोरे (२३) व ट्रॅक्टर चालक राष्ट्रपाल सावजी ठाकरे (५०) असे गंभीर जखमींची नावे आहेत. लाखांदूर तालुक्यातील सावरगाव येथील शेतकरी ट्रॅक्टरने (एम एच ३६ एल ७१५०) कडधान्य घेऊन लाखांदूर येथे विकण्यासाठी गुरुवारी सकाळी येत होता. त्यावेळी ट्रॅलीसह टॅक्टर पुलावरून ३० फूट खाली कोसळला.
अपघाताची माहिती होताच परिसरातील नागिरकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच सावरगाव अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असल्याने या अपघाताची माहिती मिळताच गावकरीही धावून आले. अण्णा पारधी, ट्रॅक्टर चालक राष्ट्रपाल ठाकरे व राधेश्याम ढोरे गंभीर जखमी झाल्याचे दिसून आले. तोपर्यंत लाखांदूर पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात माहिती देऊन पोलिसांनी रुग्णवाहिका बोलावली. यात तिघांनाही तत्काळ लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांदरम्यान अण्णा पारधी यांच्या मृत्यू झाला, तर गंभीर जखमी असलेल्या दोघांना उपचारांसाठी ब्रह्मपुरी येथे हलविण्यात आले आहे. एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती आहे.
मागून येणाऱ्या भरधाव टिप्परने केला घात
लाखांदूर ते पवनी मार्गावरी लाखांदूरलगत चुलबंद नदीच्या पुलावर येत असताना मागून एक भरधाव टिप्पर येत होता. साईड देताना चिखलणीसाठी ट्रॅक्टरच्या मोठ्या चाकांना लावलेले कॅचबिल टिप्परला धडकेल म्हणून चालकाने ट्रॅक्टर बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच वेळी चालकाचे नियंत्रण गेले आणि पुलाचे सुरक्षा कठडे तोडून ट्राॅलीसह टॅक्टर तब्बल ३० फूट खोल चुलबंद नदीत कोसळला. सध्या चूलबंद नदीवरील पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. तेथे बांबूचे मोठ्या प्रमाणत सेंट्रिंग लावण्यात आले आहे. हे सेंट्रिंग तोडून ट्रॅक्टर खाली कोसळला. लाखांदूर पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, पुढील तपास सुरू आहे.